विशेष तक्रार निवारण शिबिरामुळे पोलिस नागरिकांचे संबंध वृद्धिंगत

उपराजधानी नागपूर

नागपूर : विशेष तक्रार निवारण शिबिराच्या माध्यमातून पोलिस आणि नागरिक यांच्यातील संबंध अधिक वृद्धिंगत होत आहेत, असे प्रतिपादन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले. पोलिस जिमखाना येथे सोमवारी आयोजित ‘विशेष तक्रार निवारण शिबिरा’ त ते बोलत होते.

भूमाफियांना निर्बंध घालणारा विशेष तक्रार निवारण शिबिर हा एक पथदर्शी प्रकल्प आहे. यामाध्यमातून भूखंडाच्या बाबतीत फसवणूक तसेच वाढत्या गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी योग्य ती कारवाई करूप नागरिकांच्या तक्रारींचा त्वरित निपटारा करण्यात येत असून 75 प्रकरणांवर सुनावणी घेण्यात आली. गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली या प्रकरणांवर संबंधित विभागांना यावेळी सूचना देण्यात आल्यात.

पोलिस आयुक्त अमितेश कुमार, अपर आयुक्त सुनील फुलारी, नवीनचंद्र रेड्डी, डॉ. दिलीप झळके, उपायुक्त विनिता साहू, लोहीत मतानी, अक्षय शिंदे, निलोत्पल, गजानन राजमाने, विवेक मसाळ, सारंग आव्हाड, डॉ. बसवराज तेली, डॉ. संदीप पखाले तसेच महानगरपालिका उपायुक्त मिलिंद मेश्राम, महेश मोरोने, नागपूर सुधार प्रन्यासचे कार्यकारी अभियंता एस. एन. चिमुरकर, सह उपनिबंधक किशोर बलिंगे, अनंत अरमरकर, सह जिल्हा निबंधक अ. स. उघडे, महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे उपसंचालक आर. पी. चौरसिया, नगर भूमापन अधिकारी सतीश पवार, जिल्हाधिकारी कार्यालयाचे तहसीलदार सूर्यकांत पाटील, भूमि अभिलेख अधीक्षक गजानन दाबेराव आदी उपस्थित होते.

मोठ्या शहरांमध्ये विविध आमिषे दाखविण्यासह दबाव व दहशत निर्माण करून कोट्यवधी रुपयांचे भूखंड बळकावून सामान्य नागरिकांची फसवणूक केली जाते. अशा असामाजिकतत्त्वांवर वेळीच निर्बंध आणणारे दुसरे विशेष तक्रार निवारण शिबिर श्री. देशमुख [ home minister deshmukh ] यांच्या उपस्थितीत पार पडले.

शिबिरात गुंडगिरी, भूमाफिया, अवैध व्यवसाय, आर्थिक फसवणूक, अतिक्रमण करणे, अवैधरित्या मालमत्तेवर ताबा मिळविणे अशा स्वरुपाच्या 75 तक्रारी आल्या. नागरिकांनी आर्थिक गुंतवणूक करण्यापूर्वी त्यासंबंधित संस्थेची खातरजमा करावी. कोणाच्याही आमिषांना किंवा भूलथापांना बळी पडू नये. नागरिकांना भयमुक्त जगता यावे, यासाठी प्रयत्न होत असल्याचेही मंत्री देशमुख म्हणाले.

नागरिकांच्या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी संबंधित शासकीय विभागाचे अधिकारी तसेच पोलिस विभागाचे झोनल अधिकारी यांच्या समन्वयाने दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात येत आहे. या शिबिरात शहराच्या विविध भागातील भूमाफियांच्या कारवाईबाबत नागरिकांनी ठोस तक्रारी केल्यात. यासंबंधात पोलिसांच्या नोंदी, नागरिकांच्या तक्रारी तसेच याबाबत वस्तुस्थितीवर चर्चा झाली. दरम्यान, यासंबंधी पहिले प्रथम विशेष तक्रार निवारण शिबिर मागील आॅक्टोबरमध्ये घेण्यात आले होते. यावेळी दाखल झालेल्या 50 अर्जांवर कारवाई करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *