राज्यभरात १४ ते २८ जानेवारीदरम्यान मराठी भाषा संवर्धन पंधरवडा

राजधानी मुंबई

मुंबई : मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्ताने राज्य शासनाच्यावतीने ग्रंथप्रदर्शन, अभिवाचन स्पर्धा आणि मराठी प्रश्नमंजुषा अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. १४ ते २८ जानेवारी २०२१ या कालावधीत हा पंधरवडा साजरा केला जाणार आहे.

मराठी भाषा विभाग, राज्य मराठी विकास संस्था, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ, पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, उच्च व तंत्र शिक्षण (ग्रंथालय) विभाग आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांच्या माध्यमातून मराठी भाषेची महती सांगणाऱ्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

पंधरवड्याचे उद्घाटन १४ जानेवारी रोजी मंत्रालयाच्या त्रिमुर्ती प्रांगणात येथे सकाळी ११ वाजता मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी मराठी भाषेसाठी वेगवेगळ्या प्रकारे योगदान देणाऱ्या मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांना गौरविण्यात येईल.

बसमध्ये फिरते प्रदर्शन
भाषा संचालनालयाचा परिभाषा कोश, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ आणि शासकीय मुद्रणालयाद्वारे प्रकाशित करण्यात आलेल्या पुस्तकांचे प्रदर्शन आगळ्यावेगळ्या स्वरुपात असणार आहे. बेस्टच्या  निलांबरी बसमध्ये  फिरते प्रदर्शन असणार आहे. मंत्रालय आवारातून निघणारी ही बस पुढील दोन दिवस फोर्ट, नरिमन पाईंट या भागात असेल. या प्रदर्शनातून साहित्य रसिकांना सवलतीच्या दरात पुस्तके विकत घेता येतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *