Home नागपूर राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या इमारतीचे काम वेगाने पूर्ण करा : पालकमंत्री 

राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या इमारतीचे काम वेगाने पूर्ण करा : पालकमंत्री 

54

नागपूर : वारंगा येथील राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीचे काम आंतरराष्ट्रीय मानकांनुसार गुणावत्तापूर्ण जलदगतीने पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी विद्यापीठ प्रशासनाला आज दिले. वारंगा येथे राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या परिसरातील इमारत बांधकामांची पाहणी केल्यानंतर अधिकारी, विकासक आणि वास्तुविशारद यांच्यासोबत आढावा बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते.

विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, कुलगुरु विजेंद्र कुमार, विशेष कार्य अधिकारी प्रा. रमेश कुमार, कुलसचिव आशिष दीक्षित, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता विद्याधर सरदेशमुख, कार्यकारी अभियंता जनार्दन भानुसे, उपविभागीय अभियंता प्रशांत शंकरपुरे, वास्तुविशारद परमजितसिंह आहुजा, मनोज लद्धड, महावितरणचे मुख्य अभियंता डी. एल. दोडके, अधीक्षक अभियंता अमित परांजपे, बुटीबोरीचे कार्यकारी अभियंता प्रफुल्ल लांडे, एनएमआरडीएचे कार्यकारी अभियंता राजेश मेघराजानी, राघवेंद्र चौरसिया आणि सुहास रंगारी आदी उपस्थित होते.

येथील सर्व इमारतींचे बांधकाम करताना पर्यावरण संवर्धनाच्या सर्व आदर्श मानकांचे पालन करण्याच्या सूचना दिल्या. येथील परिसरात वृक्षारोपण करण्याचे नियोजन करताना तलाव, इमारती आणि रस्त्याच्या दुतर्फा सौंदर्यीकरण करावे. त्यासाठी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या इमारतीप्रमाणे म्यूरल्स आणि शिल्पचित्रांवर भर देण्याचे श्री. राऊत यांनी सांगितले.

येत्या 31 मार्चपर्यंतची आवश्यक तयारी पूर्ण करण्यासाठी समिती गठीत करून जबाबदारी निश्चित करावी. 5 फेब्रुवारीला आढावा घेण्यासाठी पालकमंत्री येणार असून, त्यामुळे इंटेरियरसह सर्व कामांना दर्जासह गती द्यावी. परिसरात आयआयआय टी, संस्कृत विद्यापीठासारख्या मोठ्या शैक्षणिक संस्था येणार असल्याने विजेच्या अखंडित पुरवठ्यासाठी स्वतंत्र तसेच समर्पित सब स्टेशन उभारण्यासंबंधीचा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देशही त्यांनी महावितरण अधिकाऱ्यांना दिले. संग्रहालयात कायदे क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या नामांकित कायदेतज्ज्ञ तसेच आकर्षक शिल्प, कलाकृती प्रदर्शित करण्यासाठी डॉ. राऊत यांनी विद्यापीठ प्रशासनाला निर्देश दिले.

विधी विद्यापीठाशी संबधित मुख्यमंत्र्यांसमवेत 9 जानेवारीला दूरदृष्य प्रणालीद्वारे बैठक झाली. त्या अनुषंगाने नवीन इमारत बांधकामाचा समावेश करण्याकरिता 164 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक आणि नकाशे यासह राज्य शासनास प्रस्ताव सादर करण्याचे पत्र शासनाकडून विद्यापीठास देण्यात आले. विद्यापीठाचा प्रस्ताव सोमवारी 18 जानेवारीला राज्य शासनाकडे पाठविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पाण्याचा पुनर्वापर करताना त्याचे जलशुद्धीकरण करुन तसेच विद्युत वापर करताना सौरऊर्जेवर भर देत शून्य खर्चावर आणण्याबाबत सूचना केल्या. जलशुद्धीकरणातून मिथेनचा वापर करता येईल, सायबर सुरक्षा, अग्निशामक भिंती, परस्परसंवादी व डिजिटल पोडियम व स्मार्ट बोर्ड, वातानुकूलन यंत्रणा, नागपुरातील तापमानाचा अंदाज लक्षात घेत उच्च तंत्रज्ञानाने उष्णतेचा भार टाळण्यासाठी पाच थरांचे इन्सुलेशन, हरित इमारतीच्या तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे सांगून 31 मार्चपर्यंत प्रशासकीय इमारतीच्या ब्लॉकचे काम पूर्ण करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या. भविष्यात पाण्याची गरज लक्षात घेत पाणी साठवणारा त्या क्षमतेचा तलाव विकसित करावा. जवळपासच्या स्टोरेज ट्रॅक केंद्राला जोडणाऱ्या जलवाहिन्यांवरील पाणीसाठ्यासाठी विशिष्ट दगडाचा वापर करावा. दोन इमारतींना जोडणारे स्कायब्रीज तसेच बांधकामाच्या दुसऱ्या टप्प्यात पूल, ग्रंथालय आणि सोबत वायफाय देखील उपलब्ध करुन देण्याचे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here