Home उपराजधानी नागपूर राज्यात कोरोना लसीकरण मोहीम प्रारंभ

राज्यात कोरोना लसीकरण मोहीम प्रारंभ

82

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्रीयस्तरावरील शुभारंभानंतर महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शनिवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास मोहिमेचा राज्यस्तरीय शुभारंभ झाला.
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जालना येथे तर राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या हस्ते शिरोळ येथे शुभारंभ करण्यात आला. बहुतांश जिल्ह्यांमध्ये संबंधित जिल्ह्यांचे पालकमंत्री, स्थानिक लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महापालिका आयुक्त यांच्या उपस्थितीत लसीकरणाचा शुभारंभ झाला. शनिवारी सायंकाळी सात वाजेपर्यंत लसीकरण सुरू होते. सुमारे १८ हजार ३३८ हून अधिक (सुमारे ६४ टक्के) कर्मचाºयांना लस देण्यात आली. दिवसभरात कुठेही लसीमुळे गंभीर दुष्परिणाम झाल्याची नोंद नसल्याचे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले.

मुंबई शहर पालकमंत्री अस्लम शेख यांच्या हस्ते जे.जे. रुग्णालयातील लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी आमदार अमीन पटेल, मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने आदी उपस्थित होते.
राज्यात सकाळी ११ वाजेनंतर लसीकरणाला सुरूवात झाली. काही ठिकाणी कोविन-अ‍ॅपमध्ये तांत्रिक अडचण आल्याने मॅन्युअल नोंदणीसाठी केंद्र्र शासनाने परवानगी दिली. एकंदरीतच लस घेण्यासाठी ठिकठिकाणी आरोग्य कर्मचाºयांमध्ये उत्साह दिसून आल्याचे डॉ. व्यास यांनी सांगितले.

पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ
राष्ट्र आणि राज्यस्तरावरील शुभारंभानंतर जिल्ह्यांमध्ये लसीकरणाला सुरुवात झाली. सातारामध्ये पालकमंत्री बाळासाहेब पाटील, कराड येथे गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई, औरंगाबादेत पालकमंत्री सुभाष देसाई, जळगावात पालकमंत्री गुलाबराव पाटील, नागपूर येथे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, लातुरमध्ये पालकमंत्री अमित देशमुख, राज्यमंत्री संजय बनसोडे, यवतमाळ-दारव्हा येथे पालकमंत्री संजय राठोड, कोल्हापूर येथे आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, रायगड-अलिबाग येथे पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते लसीकरणाचा शुभारंभ झाला.