Home उपराजधानी नागपूर ग्रामपंचायत निवडणूक २०२० : अनेक ठिकाणी नवी उमेद, कुठे प्रस्थापितांना धक्का

ग्रामपंचायत निवडणूक २०२० : अनेक ठिकाणी नवी उमेद, कुठे प्रस्थापितांना धक्का

49

नागपूर : राज्यातील १२ हजार ७११ ग्रामपंचायत निवडणुकीचा [ gram panchayat election 2020] निकाल आज जाहीर करण्यात येत असून आपल्याला चांगले यश मिळाल्याचा दावा विविध राजकीय पक्ष करत आहेत. मात्र, अनेक ठिकाणी नव्यांना संधी मिळाली, तर काळी ठिकाणी प्रस्थापितांना सत्ता गमवावी लागली आहे.
नागपूर जिल्ह्यात १२९ ग्रामपंचायतींपैकी ६५ ग्रामपंचायतींमधे भाजपाने बहुमत मिळवले आहे. तर, आठ ग्रामपंचायतींमध्ये भाजपा समर्थित अपक्ष उमेदवार निवडून आले आहेत. अशा एकूण ७३ ग्रामपंचायतीत भाजपाने विजय संपादन केला आहे.

काटोल विधानसभा मतदार संघात काटोल आणि नरखेड या दोन तालुक्यांमधल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गटाने एकहाती विजय मिळवली आहे. काटोल तालुक्यातील तीन ही ग्रामपंचायतीवर तर, नरखेड तालुक्यात १७ पैकी १६ ग्रामपंचायतींमधे अनिल देशमुख गटाने विजय मिळवला. नागपूर तालुक्यात बाजारगाव सर्कलमधील पेठ ग्रामपंचायतीत सर्वच्या सर्व नऊ जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहे.

वर्धा जिल्ह्यात ५० ग्रामपंचायतीच्या निवडणूकीचे निकाल आज जाहीर झाले. यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार मुसंडी मारल्याचे दिसून येत आहे. भाजपाच्या हाती असलेल्या अनेक ग्रामपंचायतीवर यावेळी मतदारांनी काँग्रेसला कौल दिला आहे.

जळगाव जिल्ह्यातील ७८३ पैकी ६८७ ग्रामपंचायतींसाठी झालेल्या निवडणुकीची आज मतमोजणी झाली. जिल्ह्यातील बहुतांश ग्रामपंचायतींवर भाजपाने वर्चस्व राखले. भाजपा पुरस्कृत पॅनेलचा बहुतांश ठिकाणी विजय झाला. माजी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या मतदारसंघात अनेक ठिकाणी राष्ट्रवादीने जोरदार टक्कर दिली, काही ठिकाणी मुसंडीही मारली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात एकट्या काँग्रेसने ६५ टक्के, तर महाविकास आघाडीच्या मिळून ७५ टक्के ग्रामपंचायतीत विजय मिळाल्याचा दावा करण्यात येत आहे. हा निकाल म्हणजे जनतेनं महाविकास आघाडीच्या कारभाराला दिलेली पसंती आहे, अशी पुस्तीही जोडण्यात येत आहे. दुसरीकडे जिल्ह्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत एकहाती विजय मिळवला असल्याचा दावा भाजपाने केला आहे.

लातूर जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये मतदारांनी तरुणांना, शिक्षित उमेदवारांना प्राधान्य दिल्याचे दिसून येत आहे. उदगीर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हा परिषद अध्यक्ष अध्यक्ष राहुल केंद्रे यांच्या वषार्नुवर्षे ताब्यात असलेल्या ग्रामपंचायतीवर झेंडा फडकावला आहे. भाजपा आमदार रमेश कराड यांनी लातूर ग्रामीणमध्ये अद्यापही वर्चस्व असल्याचे दाखवून दिले. कोळी गावात निवळी गावात भाजपाचे संपूर्ण पॅनल निवडून आले. त्यात देवणी तालुक्यात ३४ पैकी २४ ग्रामपंचायतीवर भाजपाने ताबा मिळवला आहे.

नाशिक जिल्ह्यात बहुतांश ग्राम पंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीने बाजी मारली आहे. मालेगाव तालुक्यात ९६ ग्राम पंचायत निवडणूक झाली़ यात बहुतांश ठिकाणी कृषिमंत्री दादा भुसे यांना कौल मिळाला आहे. सिन्नर तालुक्यात सोमठाण ग्राम पंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार माणिकराव कोकाटे यांना त्यांचे बंधू भरत कोकाटे यांच्या पॅनलने ११ पैकी सात जागा जिंकून धक्का दिला आहे. नाशिक तालुक्यात पळसे ग्रामपंचायत निवडणुकीत पूर्वाश्रमी शिवसेनेचे असलेल्या नवनाथ गायधनी यांनी काँग्रेस आणि अन्य पक्षांना बरोबर घेऊन १७ पैकी १२ जागांवर विजय मिळवून धक्का दिला आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्राम पंचायत निवडणूक निकालात ७० पैकी ४२ ग्रामपंचायतीवर भाजपा पुरस्कृत पॅनेलने झेंडा फडकवला आहे. शिवसेनेला २२ ग्रामपंचायतीवर झेंडा फडकवता आला. मात्र, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला एकही ग्रामपंचायत मिळवता आली नाही. देवगड तालुक्यात मोंड ग्रामपंचायत शिवसेना आणि राष्ट्रवादीकडे गेल्याने महाविकास आघाडीला एकमेव ग्रामपंचायत मिळवता आली. तर तीन ठिकाणी ग्रामविकास पॅनलचा विजय झाला आहे. इन्सुली आणि गोवेरी या दोन ग्रामपंचायतीची त्रिशंकू अवस्था असल्याचे दिसून येते.

जालना जिल्ह्यात सर्व ४४६ ग्रामपंचायतींचे निवडणूक निकाल जाहीर झाले आहेत. भोकरदन तालुक्यात ९१ ग्रामपंचायतींपैकी ६६ ग्रामपंचायतींवर भाजपा पुरस्कृत पॅनलचा विजय झाल्याचा दावा भाजपाने केला आहे. जालना तालुक्यातील ८१ पैकी बहुतांश ग्रामपंचायतींवर शिवसेना पुरस्कृत पॅनलचे उमेदवार विजय झाले आहेत. घनसावंगी तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस, तर अंबड तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपाचे वर्चस्व राहिले आहे.

काँग्रेसचा बालेकिल्ला मानल्या जाणाºया नंदुरबारमध्ये काँग्रेसने जवळपास ३७ ग्रामपंचायतींवर विजयाचा दावा केला आहे, तर २७ ग्रामपंचायतींवर भाजपाने विजयाचा दावा केला आहे.

सांगली जिल्ह्यात मतदानाआधीच बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायतीसह एकत्रित निकाल पाहता सर्वाधिक ग्रामपंचायती जिंकून काँग्रेस पहिल्या क्रमांकावर आहे. काँग्रेस पॅनल-४९, राष्ट्रवादी पॅनल-३४, स्थानिक आघाड्या- ३४, भाजपा पॅनल-२०, तर शिवसेना पॅनलने १५ ग्रामपंचायतींवर झेंडा फडकवला आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here