Home राजधानी मुंबई संयम आणि नियम पाळले नाही तर यम येतो

संयम आणि नियम पाळले नाही तर यम येतो

61

मुंबई : रस्ते सुरक्षा हा जीवनशैलीचा भाग व्हावा. नियम आणि संयम या दोन्ही शब्दांत ‘यम’ आहे. जर वाहन चालवताना नियम आणि संयम नाही पाळला तर यम भेटीला येतो, जो आपला जीव घेऊन जातो. राज्यातील अपघातग्रस्त जागा, वळणे लक्षात घेऊन अशा ठिकाणी ‘ट्रॉमा केअर सेंटर’ची उभारणी करावी. राज्यात अपघात होऊच नयेत म्हणून सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज असून वाहतूक नियमांचे पालन करावे, असे आवाहनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

सह्याद्री अतिथीगृह येथे परिवहन विभाग, महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने 32 व्या राज्य रस्ता सुरक्षा महिन्याचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे [ chief minister udhhav thakare] यांच्या हस्ते करण्यात आले.

रस्त्यांवरील नियम पाळताना किंवा रस्ते क्रॉस करताना ज्या सोयी-सुविधा असतात त्यात सहजता हवी. देशाच्या अपघात यादीत महाराष्ट्राचे नाव येणार नाही याची काळजी प्रत्येकाने घ्यायला हवी. त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. वाहनचालकांनी वाहतुकीचे नियम स्वयंस्फूर्तीने पाळावेत. स्वत:सह दुसºयाचाही जीव धोक्यात येणार नाही याची काळजी घ्यावी.

नवीन तंत्रज्ञान, अधिक वेगाच्या गाड्या येत आहेत त्या दृष्टीने माहिती देणे आणि जनजागृती करणे महत्त्वाचे आहे. वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देणाºया संस्थांमधील कर्मचाºयांना नियम आणि शिस्त याची माहिती हवी. तरच ते प्रशिक्षण देऊ शकतील. वाहतूक नियम, शिस्त यांचे पालन करण्यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे. शालेय विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे शिक्षण द्यावे. कार्यक्रमात प्रकाशित दिनदर्शिकेमध्ये शालेय विद्यार्थ्यांनी रस्ते सुरक्षा चित्र आणि स्लोगन तयार केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी त्यांचे कौतुक केले. या क्षेत्रातील स्वयंसेवी संस्था, व्यक्तींना धन्यवाद देऊन मुख्यमंत्र्यांनी ते करत असलेल्या जनजागृतीच्या कामाचा गौरव केला.

अपघात कमी करण्यासाठी प्रयत्न : परब
परिवहन मंत्री अनिल परब म्हणाले, सडक सुरक्षा- जीवन रक्षा हे यावर्षीच्या अभियानाचे घोषवाक्य असून हे अभियान यावेळी पहिल्यांदाच 18 जानेवारी ते 17 फेब्रुवारी २०२१ पर्यत महिनाभरासाठी सुरू राहणार आहे. कोरोनासारख्या महामारीवर आपण अथक प्रयत्नांतून, नियमांचे पालन करत आणि परस्परांच्या सहकार्याने नियंत्रण मिळवू शकलो. यावर्षी जवळपास २४ हजाराच्या आसपास अपघात झाले असून आधीच्यावर्षीच्या तुलनेत त्यात २३ टक्के कमी आली आहे, तर मृत्यूमध्ये १० टक्के कमी आली आहे. असे असले तरी अपघातातील मृत्यूंचे प्रमाण कमी नाही. ते आणखी कमी करण्यासाठी विविध उपक्रमातून वाहतूक नियमांची जनजागृती करणे आवश्यक आहे. स्थानिक स्वराज्य संस्था, स्वयंसेवी संस्था, शाळा, महाविद्यालय यांच्या माध्यमातून जनजागृती करुन या वर्षभरात अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन मंत्री परब यांनी केले.

यावेळी मुंबई शहर पालकमंत्री अस्लम शेख, खासदार अरविंद सावंत, आमदार मंगलप्रभात लोढा, परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, महासंचालक हेमंत नगराळे, अपर पोलिस महासंचालक डॉ. भूषणकुमार उपाध्याय परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांच्यासह परिवहन, गृह विभागाचे वरिष्ठ अधिकारी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here