नागपुरातील शुभ टीमच्या वतीने ‘महाराष्ट्राची संत परंपरा’ चित्ररथाचे काम अंतिम टप्प्यात

उपराजधानी नागपूर राष्ट्रीय

 नागपूर / नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनी येथील ऐतिहासिक राजपथावर होणाऱ्या पथसंचलनासाठी महाराष्ट्राच्या संत परंपरेवर आधारित सुंदर व सुबक अशा चित्ररथाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या पथसंचलनाची पूर्वतयारी म्हणून होणाऱ्या रंगीत तालमीसाठी चित्ररथ बांधणीच्या कामाने चांगलीच गती घेतली आहे.

महाराष्ट्रासह अन्य निवड झालेल्या राज्य आणि केंद्रीय मंत्रालयांचे चित्ररथ राजपथावरील पथसंचलनात सहभागी होणार आहेत. येथील कँटॉन्मेंट परिसरातील रंगशाळेत महाराष्ट्राच्या चित्ररथाचे वैविध्यपूर्ण काम पूर्णत्वास येत असून या चित्ररथावरील प्रतिकृती खास आकर्षण ठरत आहेत.

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने प्रजासत्ताकदिनी राजपथावर [ republicday parade on rajpath] राज्याच्या वतीने प्रदर्शित होणाऱ्या चित्ररथाच्या संकल्पनेपासून ते चित्ररथ बांधणी व कलाकारांच्या सरावासह प्रत्यक्ष चित्ररथ संचलनाचे कार्य पार पडते.

राज्याच्या चित्ररथ बांधणीचे कार्य नागपूर येथील ‘टीम शुभ’ चे [ team shubh ] प्रमुख राहुल धनसरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. या चित्ररथाचे संकल्पनाचित्र व त्रिमिती प्रतिकृती रोशन गुले (24) आणि तुषार प्रधान (23) या तरूण कलाकारांनी तयार केले आहे. कला दिग्दर्शक नरेश चरडे आणि पंकज इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण 30 कलाकार हा आकर्षक चित्ररथ उभारत आहेत.

असा आहे चित्ररथ : चित्ररथाच्या प्रारंभी वारकरी संप्रदायाचा पाया रचणारे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची 8 फुटांची आसनस्थ मूर्ती आहे. त्यांच्या मूर्तीसमोर ज्ञानेश्वरी ग्रंथ दर्शविण्यात आला आहे. चित्ररथाच्या मध्यभागी भक्ती आणि शक्तीचा संदेश देणारे हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि वारकरी संप्रदायाच्या इमारतीचे कळस असणारे संत तुकाराम महाराज यांची भेट दर्शविणारे प्रत्येकी 8 फूट उंचीचे दोन पुतळे उभारण्यात आले आहेत. या पाठोपाठ राज्यातील संतांचे व कोट्यवधी भक्तांचे दैवत असणाऱ्या पांडुरंगाची कटेवर हात असणारी 8.5 फूट उंचीची लोभस मूर्ती उभारण्यात आली आहे. चित्ररथाच्या शेवटच्या भागात 8 फूट उंचीचा संतवाणी हा ग्रंथ उभारण्यात आला आहे व यावर संतांची वचने लिहिण्यात आली आहेत. या सर्व पुतळ्यांची बांधणी पूर्ण झाली असून त्यावर रंगकाम सुरु आहे.

चित्ररथाच्या दोन्ही बाजूस संत जनाबाई, संत कान्होपात्रा, संत नामदेव, संत शेख महंमद, संत नरहरी, संत सावता, संत दामाजीपंत, संत गोरोबा, संत एकनाथ, संत सेना, संत चोखामेळा यांच्या प्रतिकृती असणार आहेत. या प्रतिकृती बनविण्याचे काम सुरु असून त्यांच्या बांधणीचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे राहुल धनसरे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *