नवी दिल्ली : रस्त्यावरील अपघात टाळण्यासाठी जागरूकता मोहिमेत स्थानिक लोकप्रतिनिधींची मदत घेतली जाईल, यासाठीचा कार्यक्रम राज्य शासन लवकरच आखणार असल्याची माहिती, राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी येथे दिली.
येथील विज्ञान भवनात केंद्रीय परिवहन मंत्रालयाच्यावतीने ४० व्या परिवहन विकास बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीची अध्यक्षता केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केली. केंद्रीय परिवहन राज्यमंत्री (सेवानिवृत्त) मेजर जनरल वी.के. सिंग यांच्या सह केंद्रीय विभागाचे सचिव उपस्थित होते. याबैठकीस काही राज्याचे परिवहन मंत्री प्रत्यक्ष तर काही राज्यांचे परिवहन मंत्री दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते. महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री श्री. परब तसेच परिवहन आयुक्त अविनाथ ढकणे उपस्थित होते.
श्री. परब म्हणाले, रस्त्यावर होणाऱ्या अपघातामध्ये पहिल्या तासात जर अपघातग्रस्ताला रूग्णालयात घेऊन गेल्यास वाचविण्याची शक्यता अधिक असते. याबद्दलची जागरूकता मोहिम राबविण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधीची मदत घेतली जाईल. त्यासाठी लवकरच राज्यशासन कार्यक्रम आखणार असल्याचे त्यांनी सांगितले. यासह ऑल इंडिया परमीट मिळविणाऱ्या वाहनांसाठी काही कठोर नियम लावावे, अशी मागणीही श्री. परब यांनी यावेळी केली. ते म्हणाले, ज्या राज्यांमध्ये यासंदर्भात कर कमी आहे अशा राज्यांमधून परमिट मिळविली जात असून याचा फटका राज्य शासनाला होत असल्यामुळे यावर पुन्हा विचार होणे गरजेचे आहे.
भाड्याने उपलब्ध होणारे वाहन जे ऑपवर आधारित आहेत अशा ग्रीगेटर वाहनांसाठीची देखील काही धोरण निश्चित होण्याची मागणी श्री.परब यांनी बैठकीत केली. यासह जुने पडीत वाहनांमुळे होणारे प्रदूषण थांबविण्यासाठी अशा वाहनांची विल्हेवाट लावण्याची परवानगी मिळावी ही मागणीही श्री. परब यांनी बैठकीत लावून धरली. श्री. परब यांनी बैठकीत राज्यातील परिवहन स्थितीबद्दलची माहिती दिली. तसेच, केंद्राकडून आवश्यक निधी राज्यशासनाला मिळावा अशी अपेक्षाही व्यक्त केली.