Home राजधानी मुंबई कापसाचे चुकारे वेळेत देण्यासाठी पणन महासंघाच्या १५०० कोटींच्या कर्जास शासनाची हमी

कापसाचे चुकारे वेळेत देण्यासाठी पणन महासंघाच्या १५०० कोटींच्या कर्जास शासनाची हमी

55

cabinate decision : किमान आधारभूत दराने खरेदी करण्यात आलेल्या कापसाचे चुकारे शेतकऱ्यांना वेळेत अदा करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाद्वारे बँक आॅफ महाराष्ट्र यांच्याकडून ६.३५ टक्के व्याजदराने घ्यावयाच्या १५०० कोटी रुपयांच्या कर्जास शासन हमी मंजूर करण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे [ Chief Minister Udhhav Thakare] होते.

याचबरोबर मंजूर होणाऱ्या शासन हमीवर कापूस पणन महासंघास द्यावे लागणाऱे हमी शुल्क देखील माफ करण्यात आले आहे. हंगाम २०२०-२१ करिता केंद्र शासनाने मध्यम धाग्याच्या कापसाला ५५१५ प्रति क्विंटल तर लांब धाग्याच्या कापसाला ५८२५ प्रति क्विंटल असा हमी दर निश्चित केला आहे. राज्यात झालेला समाधानकारक पाऊस, अनुकूल हवामान यामुळे या हंगामात ४०० लाख क्विंटल कापसाचे उत्पादन अपेक्षित आहे.

कापसाचे आंतरराष्ट्रीय बाजारात भाव कमी असल्याने, खुल्या बाजारातील कापसाचे दर कमी झालेले असल्याने व केंद्र सरकारने हमी भावात केलेली वाढ विचारात घेता कापूस पणन महासंघास या हंगामात मागील हंगामापेक्षा मोठ्या प्रमाणात कापसाची हमी भावाने खरेदी करावी लागणार आहे. त्यासाठी पणन महासंघास बँक आॅफ महाराष्ट्र यांनी ६.३५ टक्के व्याजदराने १५०० कोटी रुपयांचे कर्ज देण्यास मान्यता दिली आहे. हे कर्ज कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे चुकारे अदा करण्यासाठी आवश्यक असल्याने कर्जास हमी मंजूर करण्यात आली आहे.

खासगी बँकांना मर्यादित प्रमाणात शासकीय बँकींग व्यवहार हाताळण्यास परवानगी
खासगी बँकांना मर्यादित प्रमाणात शासकीय बँकींग व्यवहार हाताळण्यास आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.यापूर्वी शासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम व महामंडळांकडील बँकींग व्यवहार केवळ राष्ट्रीयकृत बँकांमार्फत करण्याचे ठरले आहे. याशिवाय आहरण व संवितरण अधिकारी यांचे वेतन आणि भत्ते तसेच निवृत्ती वेतनधारकांचे बँक खाते याबाबतही राष्ट्रीयकृत बँकांना मान्यता देण्यात आली आहे.

तथापि, मर्यादित प्रमाणात खाजगी बँकांना देखील शासकीय बँकींग व्यवहार हाताळण्याची परवानगी देण्यात आली आहे. यामध्ये विभागांना खासगी बँकांच्या मदतीने संगणकीय तंत्रज्ञान आधारित प्रणाली व सेवा वापरता येईल. त्यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क या बँका आकारणार नाहीत, याची खात्री संबंधितानी करून घ्यावी लागेल. वेतन व भत्त्यांसाठी असलेली कार्यालयीन बँक खाती शासन मान्यता देईल त्या खासगी बँकांमध्ये उघडता येतील. मात्र, वेतन व भत्त्याव्यतिरिक्त अन्य कोणताही निधी यात जमा करता येणार नाही. तसेच निवृत्ती वेतनधारकांना स्वेच्छेने शासनाने मान्यता दिलेल्या कोणत्याही खासगी बँकेत निवृत्तीवेतन खाते उघडता येईल. खासगी बँकांना यासंदर्भात शासनाकडे स्वतंत्र करार करणे आवश्यक असून इच्छुक बँकांनी २८ फेब्रुवारी २०२१ पर्यंत तसे प्रस्ताव वित्त विभागाकडे सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here