सर्वोच्च न्यायालयात होणारी मराठा आरक्षणावरची सुनावणी ५ फेब्रुवारीला घेण्याचा निर्णय

राष्ट्रीय

नवी दिल्ली : मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयात होत असलेली सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. याचिकाककर्ते विनोद पाटील यांनी बुधवारी औरंगाबाद येथे पत्रकार परिषदेत यासंबंधी माहिती दिली. सदर सुनावणी बुधवारपासून सुरू होणार होती. राज्य सरकारचे वकील मुकुल रोहतगी यांनी न्यायालयासमोर ही सुनावणी आॅनलाईन पद्धतीने न घेता प्रत्यक्षरित्या घेण्याची विनंती केली. ही सुनावणी प्रत्यक्षरित्या करता येईल का किंवा कोणत्या तारखेपासून करता येईल या बद्दल 5 फेब्रुवारीला न्यायालय निर्णय देणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.

***

मुख्य सेविकांच्या वेतन आयोगातील वेतन त्रुटी, दुरुस्ती,                                              पदोन्नतीची जलदगतीने कार्यवाही करावी

मुंबई : राज्यातील एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत कार्यरत मुख्य सेविका यांचे वेतन आयोगातील वेतन त्रुटी, दुरुस्ती व पदोन्नती तसेच सेवा विषयक दुरुस्ती करुन जलदगतीने कार्यवाही करावी, असे निर्देश महिला व बालविकास मंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर यांनी दिले.

मुख्य सेविका यांचे वेतन आयोगातील वेतन त्रुटी, दुरुस्ती व पदोन्नतीबाबत बैठक मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. याबैठकीस एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे सहायक आयुक्त नितीन म्हस्के तसेच राज्यातील मुख्य सेविका उपस्थित होत्या. मुख्य सेविका यांचे वेतन आयोगातील वेतन त्रुटी, दुरुस्ती व पदोन्नतीबाबत जिल्हानिहाय आढावा घेवून रिक्त पदे भरणे व पदोन्नतीबाबतचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा. ग्रामीण व आदिवासी क्षेत्रातील पदे प्राधान्याने भरण्यात यावी. बदली धोरण अधिक पारदर्शक राबविण्यात यावे. तसेच वित्त विभाग व ग्रामविकास यांची संयुक्त बैठक घेवून आवश्यक कार्यवाही करण्यात यावी, असेही ठाकूर यांनी सांगितले.

***

उच्च व तंत्र शिक्षण विभाग आपल्या दारी उपक्रमाची                                                    २५ जानेवारीपासून कोल्हापुरात सुरुवात

कोल्हापूर : विद्यार्थ्यांशिवाय पालक, शिक्षक, प्राचार्य, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यापीठ कर्मचारी, शैक्षणिक संस्था यांचे प्रश्न विविधस्तरावर प्रलंबित आहेत. ते तातडीने सोडवता यावे म्हणून उच्च व तंत्र शिक्षण विभाग आपल्या दारी या अभिनव उपक्रमाची सुरुवात २५ जानेवारी २०२१ पासून कोल्हापूर येथून करण्यात येणार आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी याबाबत माहिती दिली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षांचा आढावा घेण्यासाठी राज्यातील १३ अकृषी विद्यापीठांचा दौरा केल्यानंतर लक्षात आले की, विद्यार्थी पालक, शिक्षक, प्राचार्य, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यापीठ कर्मचारी, शैक्षणिक संस्था यांच्या अडचणींसाठी सर्वांना संचालक, सहसंचालक, विद्यापीठ, मंत्रालय व इतर कार्यालयात जावे लागते. विशेषत: या प्रश्नांसंदर्भात वारंवार विविध प्रशासकीय कार्यालयात भेट देऊनही विषय प्रलंबित असतात आणि यात वेळ जातो. त्यासाठी अनेकांचा वेळ आणि जाण्या येण्यासाठी लागणारे पैसे याची बचत व्हावी म्हणून उच्च व तंत्र शिक्षण विभाग मंत्रालय, आपल्या दारी हा अभिनव कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.

उच्च व तंत्र शिक्षण संचालक, तंत्र शिक्षण संचालक या विभागातील सर्व महत्त्वाच्या अधिकाºयांना एका ठिकाणी आणून विद्यार्थी,पालक यांचे प्रलंबित प्रश्न सोडवता येईल. यामुळे हा उपक्रम राज्यातील प्रत्येक विभागात त्या-त्या विद्यापीठात घेण्यात येणार आहे. याची सुरूवात शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथून करण्यात येणार आहे. तरी उच्च तंत्र शिक्षण विभागांशी ज्या काही अडचणी आहेत. त्या संदर्भात या अभिनव उपक्रमात सहभागी होतांना आवश्यक ती कागदपत्रे आणि आपल्या समस्यांचे निवेदन घेऊन यावे, असे आवाहनही श्री. सामंत यांनी केले.

प्रधान सचिव, आयुक्त राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, संचालक तंत्रशिक्षण संचालनालय, संचालक उच्च शिक्षण, संचालक कला संचालनालय, संचालक महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, संचालक ग्रंथालय संचालनालय, सह संचालक, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे सर्व उच्चपदस्थ अधिकारी व कर्मचारी या उपक्रमात सहभागी होणार आहेत. पुढील विद्यापीठांच्या उपक्रमांच्या तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार आहेत.

*****

 

शिक्षण पद्धतीत आमूलाग्र बदल करणाऱ्या ‘स्टार्स’ प्रकल्पाची अंमलबजावणी करणार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *