Home उपराजधानी नागपूर जरीपटका उड्डाणपूल हा उत्तर नागपूरला जोडणारा विकास सेतू : डॉ. नितीन राऊत

जरीपटका उड्डाणपूल हा उत्तर नागपूरला जोडणारा विकास सेतू : डॉ. नितीन राऊत

79

नागपूर : केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत प्रस्तावित जरिपटका रेल्वे उड्डाणपुलाचे [ railway flyover ] आज भूमिपूजन करण्यात आले असून हा पूल उत्तर नागपूरला जोडणारा विकास सेतू ठरेल, असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज केले.

जरीपटका रेल्वे उड्डाणपूलाचा भूमिपूजन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचे हस्ते आज झाले.  नागपूरचे महापौर दयाशंकर तिवारी, विधानपरिषद सदस्य नागो गाणार, गिरीश व्यास, प्रविण दटके, अभिजीत वंजारी, आमदार विकास ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती. केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत प्रस्तावित जरीपटका रेल्वे उड्डाणपूल 740 मीटर लांबीचा असून यासाठी 78 कोटी 92 लाख निधी अपेक्षित आहे.

डॉ. राऊत म्हणाले, नागपुरातील उत्तर नागपूर विधानसभा क्षेत्र अंतर्गत जरीपटका हे ठिकाण मध्य रेल्वेच्या [ central railway ]  नागपूर-दिल्ली ब्रॉडगेज रेल्वे लाईनवर असून महानगर पालिकेच्या हद्दीत आहे. या भागातील वाहतूकीसाठी मध्य रेल्वेचा १९२३ साली रेल्वे उड्डाणपूल बांधण्यात आला, जो सध्यस्थितीत अतिशय अरुंद म्हणजेच ७.५० मीटर रुंदीचा जीर्ण अवस्थेत आणि वाहतुकीसाठी छोटा तसेच अपुरा पडत असल्याने त्यावरून जड वाहतूक बंद करण्यात आली आहे. हा जुना पुल दुचाकी अथवा चारचाकी वाहनचालकांना दैनंदिन वाहतूकीसाठी अतिशय अडचणीचा ठरत असल्याने २०१२-२०१३ मध्ये त्याचे बळकटीकरण करण्यात आले. केवळ हलक्या वाहनांची वाहतूक आजतागायत सुरु ठेवण्यात आली.

या संदर्भात जून २०२० मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन रेल्वे उड्डाणपुलाची नव्याने रचना करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले होते. त्यानुसार अस्तित्वातील ७.५० मीटर रुंदीच्या पुलाऐवजी १०.५ मीटर रुंदीचा प्रस्तावित रेल्वे उड्डाणपूल बांधण्याचे निश्चित करण्यात आले. सोबतच जरीपटका पोचमार्गासहित सी.एम.पी.डी.आय. व मेकोसाबाग बाजूकडे वाहने जाणे-येणेसाठी पोचमार्ग बांधण्याचे निश्चित करण्यात आले. अशा प्रकारे मुख्य रेल्वे उड्डाणपुलाच्या पूर्वेकडील बाजूस तीनही दिशेला वाहतुकीसाठी पोचमागार्चे बांधकाम अंतर्भूत करण्यात आले.

सध्या अस्तित्वात असलेला उड्डाणपूल पाडून त्याच ठिकाणी नवीन रेल्वे उड्डाण पुलाचे बांधकाम करण्यासाठी केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत जुलै २०१८ मध्ये रु. ७८.९२ कोटीची मंजुरी देण्यात आली. या पूलाचे काम 24 महिन्यात पूर्ण होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

प्रस्तावित नव्या रेल्वे उड्डाण पुलामुळे सदर, बैरामजी टाऊन, गोंडवाना चौक, जरीपटका, सी.एम.पी.डी.आय., मेकोसाबाग इत्यादी भागातील नागरी वाहतुकीची दीर्घकालीन समस्या निकाली निघणार आहे. नागपूरच्या वैभवात भर टाकणारा अतिशय उपयोगी असा हा पूल असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे नागरिकांच्या पैसे श्रम वेळेत बचत होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.