अस्तित्वातील स्त्रोतांची पाणी क्षमता तपासा : सुनील केदार

विदर्भ

वर्धा : सध्याच्या अस्तित्वातील पाणीपुरवठा योजनांच्या स्त्रोतांची पाणी क्षमता तपासावी आणि नंतरच अशा योजनांवर वाढीव नळ जोडणी देण्यात यावी, अशा सूचना पशुसंवर्धनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील केदार यांनी दिल्या. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात पालकमंत्री श्री. केदार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या जिल्हा पाणी व स्वछता मिशनच्या जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत जिल्ह्याचा जल जीवन मिशनचा आराखडा सादर करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.

बैठकीला आमदार सर्वश्री अभिजित वंजारी, पंकज भोयर, रणजित कांबळे, जिल्हाधिकारी विवेक भीमनवार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे उपस्थित होते.

जल जीवन मिशन अंतर्गत प्रत्येक घरी स्वच्छ व शुद्ध पिण्याचे पाणी देणे हा केंद्र सरकारचा उद्देश अतिशय चांगला आहे. पण त्यासाठी प्रथम नळ पाणीपुरवठा योजनांचे स्रोत शाश्वत व बळकट करणे आवश्यक आहे. पहिल्या टप्प्यात प्रत्येक तालुक्यातील 5 गावे घेऊन त्यांचे स्रोत आणि पाणी साठवण क्षमता याची चाचपणी करून प्रति माणसी 55 लिटर प्रतिदिन पाणी देऊ शकतो का याची खात्री करावी. यासाठी प्रत्येक पंचायत समितीमधील 5 अधिकाऱ्यांना गावे वाटून देण्यात यावी आणि गावातील पाणीपुरवठा योजनेची क्षमता तपासणी करून घ्यावी. अन्यथा पाण्याचे दुसरे स्रोत शोधून त्यानुसार पाणी साठवण क्षमता वाढवून नंतर नळ जोडणी देण्यात यावी असे पालकमंत्री श्री. केदार यांनी यावेळी सांगितले.

जुन्या व नवीन पाणी पुरवठा योजनांचे स्रोत रिचार्ज होण्यासाठी प्रत्येक योजनेला रिचार्ज शाफ्ट करण्यात यावेत. ज्या 40 गावात /पाड्यात पाणीपुरवठा योजना नवीन घ्यायच्या आहेत तिथे सौर ऊर्जेवरील पंप बसविण्यात यावेत असेही श्री. केदार यांनी सांगितले.

पाणीपुरवठा योजनांचे स्रोत घेताना ते शाश्वत असावेत, टाक्यांची क्षमता, भविष्यातील लोकसंख्येचा विचार करून त्यांची क्षमता वृद्धी व बळकटीकरण करावे असे आमदार रणजित कांबळे यांनी यावेळी सांगितले. तर जिल्हाधिकारी यांनी विंधन विहिरींच्या ऐवजी नदी, धरण, कॅनॉल यासारखे स्रोत पाणीपुरवठा योजनांसाठी निवडावेत असे सांगितले. यावेळी ग्रामीण पाणीपुरवठा योजनेचे कार्यकारी अभियंता श्री. वाघ यांनी आराखड्याची माहिती दिली.

13 गावांची पाणीपुरवठा योजना मार्चपर्यंत पूर्ण करा वर्धा शहराला लागून असलेल्या पिपरी मेघे व 13 गावांना पाणीपुरवठा करणारी नळ योजना अद्याप पूर्ण न झाल्याचा प्रश्न आमदार पंकज भोयर यांनी उपस्थित केला. 7 टाक्यांपैकी अद्याप एकही टाकीचे काम पूर्ण झाले नाही. योजनेचे काम डिसेंबर 2019 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते, मात्र अद्याप कोणतेच काम पूर्ण झाले नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. याबाबत संबंधित कंत्राटदारावर उर्वरित कामावर दंड आकारण्यात यावा तसेच मार्चपर्यंत काम पूर्ण न झाल्यास संबंधित कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याचा प्रस्ताव पाठवावा, असे निर्देश पालकमंत्री सुनील केदार यांनी यावेळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या कार्यकारी अभियंता यांना दिलेत. बैठकीला वरिष्ठ भूजल सर्वेक्षण यंत्रणेचे भूजल वैज्ञानिक राजेश सावळे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *