नागपुरात ‘या’ वैद्यकीय प्रयोगशाळेची घोषणा

उपराजधानी नागपूर

नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे सिकलसेलच्या रुग्णांचे नमुने तपासणी प्रयोगशाळा लवकरच सुरु करण्यात येणार असून, त्यामुळे विदर्भातील रुग्णांना दिलासा मिळणार आहे. यापूर्वी अशा नमुन्यांची तपासणी मुंबई व हैदराबाद येथे करण्यात येत होती, असे सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील – यड्रावकर यांनी आज येथे सांगितले.

श्री. यड्रावकर यांनी शासकीय वैद्यकीय रुग्णालय व महाविद्यालय येथे नागपुरातील आरोग्य विभागातील विविध आरोग्यविषयक बाबींचा बैठकीत आढावा घेतला. यावेळी आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जायस्वाल, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. आर. पी. सिंग, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. देवेंद्र पातूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिपक सेलोकर यांच्यासह विभागप्रमुख उपस्थित होते. भंडारा‍ जिल्हा रुग्णालयातील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मेडीकलमधील फायर ऑडिट आणि संबंधित रुग्णालयातील सुरक्षात्मक उपाययोजना, ऑक्सिजन पुरवठ्याबाबत माहिती घेतली. आईकडून नवजात बाळांना झालेला कोविडचा संसर्ग, कोविड रुग्णांसाठीच्या व्यवस्थेची यावेळी त्यांनी माहिती घेतली.

सिकलसेलचे नमुने तपासणीसाठी मुंबई आणि हैदराबाद येथील प्रयोगशाळांमध्ये पाठविण्यात येत होते. त्यामुळे अहवाल येण्याची प्रतीक्षा करावी लागत असे. सिकलसेलच्या रुग्णांसाठी आता नागपुरातच नमुना तपासणी प्रयोगशाळा सुरु होणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

विभागातील दैनंदिन कोरोना रुग्णांची संख्या, रुग्णांवरील उपचार, उपचारानंतर देण्यात येणारा डिस्चार्ज आणि राज्य शासनाच्या कोविड लसीकरण मोहिमेतील डोसबाबतची माहिती दिली. वर्षभरातील कोविड रुग्णांची माहिती देताना भरती रुग्ण, त्यांचे तपासणी अहवाल, विलगीकरण कक्षातील स्थिती, आणि विद्यमान स्थितीची माहिती डॉ. जायस्वाल यांनी दिली.

मेडीकल येथे 16 जानेवारीला कोव्हॅक्सिन लसीकरण सुरु करण्यात आले असून, आतापर्यंत 5 हजार 200 लाभार्थ्यांना या केंद्रावरुन लस देण्यात आली आहे. आता येथे आणखी एक केंद्र सुरु करण्यात आले असल्याची माहिती श्री. यड्रावकर पाटील यांना देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *