Home प्रादेशिक विदर्भ पालकमंत्री वडेट्टीवारांची प्रजासत्ताक दिनी पर्यटनाबद्दल मोठी घोषणा

पालकमंत्री वडेट्टीवारांची प्रजासत्ताक दिनी पर्यटनाबद्दल मोठी घोषणा

59

चंद्रपूर : जगाच्या नकाशात चंद्रपूरचे नाव ताडोबा पर्यटनाच्या माध्यमातून झळकते. देशी-विदेशी पर्यटक भेटीवर येतात. येथे पर्यटनाला चालना देण्यासाठी ताज ग्रूपबरोबर करार करून पंचतारांकित हॉटेल सुरू करण्याचा निर्धार करण्यात आला असून महेंद्रा क्लब, लि-मेरीडीअन, रेडिसन ब्ल्यू यासारखी पंचतारांकित हॉटेल्स येऊ पाहत आहेत. यामुळे पर्यटनाच्या माध्यमातून महसूल व स्थानिकांना रोजगाराच्या संधी वाढतील, अशी माहिती पालकमंत्री विजय वडेट्टीवार [ minister vijay vadettiwar ] यांनी दिली.

प्रजासत्ताक दिनानिमित्त येथील पोलीस मैदानावर मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, खार जमीन विकास विभागाचे मंत्री तथा पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
बहुजनांचे कल्याणासाठी महाविकास आघाडी शासन सदैव तत्पर आहे. ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ तत्वानुसार सरकार काम करत आहे. यापुढेही असेच लोककल्याणकारी काम सुरू राहील. जिल्हा विकासाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये अग्रेसर राहावा, यासाठी समतोल विकासाची हमी देत असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.
2020 या आपत्तीच्या वर्षात आपत्ती व्यवस्थापन तसेच मदत व पुनर्वसन मंत्री म्हणून काम करता आले. पाऊस, पुर, अतिवृष्टी, चक्रीवादळ इत्यादी सर्व आपत्तीच्या ठिकाणी सामान्य माणसाच्या पाठीशी मी जातीने हजर असल्याचे त्यांनी सांगितले. संकटकाळी नागरिकांना मदत करता आली, लोकांच्या जवळ जाता आले. तसेच, बहुजन कल्याण खात्याचा मंत्री म्हणून बहुजन समाजाच्या तरुणांसाठी महत्त्वाचे व ठोस निर्णय घेता आले. या सर्व कामातून सामान्य माणसाच्या पाठीशी उभे राहण्याची मला संधी मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

सुरवातीला पालकमंत्री यांनी भारतीय संविधानामधील उद्देशिकेचे वाचन केले. ध्वजारोहनाच्या कार्यक्रमानंतर पालकमंत्र्यांच्या हस्ते कोविड योद्धांचा सन्मान करून त्यांना पुरस्कार देण्यात आले. यात जिल्हा शासकीय रुग्णालय, जिल्हा परिषद, महानगरपालिका, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी व जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयामार्फत पुरस्कार देण्यात आले.
कार्यक्रमाला जिल्हा प्रशासन, महानगरपालिका प्रशासन यासह अन्य शासकीय निमशासकीय विभाग, सामाजिक संस्था, नागरिक आदी उपस्थित होते.