शासनाच्या विविध शब्दकोशांमुळे मराठीचा भाषा व्यवहार समृध्द : माहिती संचालक हेमराज बागुल

उपराजधानी नागपूर
नागपूर : राजभाषा मराठीचा प्रसार आणि प्रचारासोबत भाषा संचालनालयाने अभ्यासकांसाठी शास्त्रीय व तांत्रिक त्रिभाषाकोश तयार करुन विद्यार्थी, अभ्यासक व अमराठी भाषकांसाठी नवे दालन निर्माण केले आहे. यातून मराठीतील आधुनिक भाषाव्यवहार समृध्द होण्यास मोठी मदत झाली असल्याचे प्रतिपादन माहिती संचालक हेमराज बागुल यांनी येथे केले.

महाराष्ट्र शासनाच्या भाषा संचालनालयातर्फे मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा साजरा करण्यात आला. त्यानिमित्त भाषा संचालनालयाने प्रकाशित केलेल्या विविध पुस्तकांचे तसेच परिभाषा कोश पुस्तकांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन श्री. बागुल यांच्याहस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके, माध्यम समन्वयक अनिल गडेकर, सहायक भाषा संचालक हरिष सुर्यवंशी, अधीक्षक संदीप गोरे आदी उपस्थित होते.

 

राजभाषा मराठीचा प्रसार आणि प्रचार सर्वदूर व्हावा आणि मराठी भाषेची प्रगती, विकास करतानाच तसेच प्रशासनामध्ये मराठीचा वापर जास्तीत जास्त व्हावा यासाठी मराठी भाषा विभागातर्फे विविध उपक्रम राबविले जात आहेत. मराठी भाषा संवर्धन पंधरवाड्याच्या निमित्ताने विविध उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. विद्यार्थी व अभ्यासकांसाठी शास्त्रीय व तांत्रिक आणि विज्ञान व तंत्रज्ञान अभ्यासकांसाठी परिभाषा कोश अत्यंत उपयुक्त असल्याचे सांगतांना हेमराज बागुल म्हणाले की, मराठीतील भाषाव्यवहार गेल्या काही वर्षात मोठ्याप्रमाणावर विस्तारला आहे. त्यातून या नव्या शब्दांचे अर्थव्यवस्थापन करण्याची मोठी गरज निर्माण झाली आहे. मराठी भाषिकांना आपल्या भाषेतील विविध शब्दांचे अर्थ आणि त्याचा छटा समजण्यासोबतच इतर भाषिकांना मराठी भाषा सुलभतेने आकलन व्हावी यादृष्टीने शब्दकोशांचे महत्त्व मोठे आहे. अलिकडच्या काळात तर विविध क्षेत्रात घडलेल्या प्रगतीमुळे अनेक नवे शब्द प्रचलित झाले आहेत. या शब्दांवरही पुढील काळात परिपूर्णतेने काम झाले पाहिजे. तरच नव्यासंदर्भात मराठी संपन्न होऊ शकेल असेही त्यांनी यावेळी सांगितले.

मराठी भाषेला राजभाषा म्हणून मान्यता मिळाल्यानंतर साहजिकच राज्यातील शालेय तसेच विद्यापिठासाठी एकरुप मराठी परिभाषा उपलब्ध करुन देण्याचे काम विभागाने यशस्वीपणे पूर्ण केले आहे. पदवी परिक्षेपर्यंत शिकविले जाणारे शास्त्रीय व तांत्रिक विषय मातृभाषेतून शिकविण्याचे उपक्रम नागपूर विद्यापिठाने सुरु केला असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

प्रारंभी सहायक भाषा संचालक हरिष सुर्यवंशी यांनी मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा निमित्त आयोजित करण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. तसेच पाहुण्याचे पुस्तक देवून स्वागत केले. संचालनालयातर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या विविध पुस्तकांचे व कोषांचे तसेच परिभाषा कोषांच्या पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन माहिती संचालक श्री. बागुल यांनी केले. कार्यक्रमाचे संचलन कार्यालय अधीक्षक संदीप गोरे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *