Home साहित्य-संस्कृती अभिसांज ... एक कथा विदर्भाच्या मातीतील बक्षीसप्राप्त ग्रामीण कथा : कमाई (भाग १)

विदर्भाच्या मातीतील बक्षीसप्राप्त ग्रामीण कथा : कमाई (भाग १)

355

लेखक
संजय मुंदलकर

रात्रभर चिलटाईनं झोपू देल्लं नोतं. कवा ह्या कडावर तं कवा थ्या कडावर. चिलूट इतक्या सफाईनं डसत व्हत का, त्याले मारलेली थापड माह्याच गालावर बसत व्हती. ह्या चिलटाईनं मले पिसावून टाकलं व्हतं. तालुक्याच्या जागी इलेक्ट्रिकसाठी अर्ज केला व्हता, पैसेबी भरले व्हते. मातर अजून मीटर आलं नोतं. म्हूनशानं अंधार अन् गरमीत झोपा लागत व्हतं. मंग मिनं चिमनीतलं तेल काढून साºया आंगाले चोपडून काढलं; तवा मले चांगली झोप लागली. म्हायी माय आंगच्याच बाजीवर ढाराढूर झोपली व्हती; तं दुसºया बाजीवर आजी घोरत व्हती.

दुसºया सकायी माय झाकटीतच उठली. कारण का तिले रामराव पाटलाच्या वावरात कापूस येचाले जा लागत व्हतं. मायनं घराजोळच्या ईरीतून पानी आनून आंगनात सडा टाकला. घर सारोलं. गायीचं दूध काढलं. चुलीत जाय करून च्याहाचा गंज मांडला अन् मले म्हनते कशी, ‘‘ऊठ रे गण्या, लौकर. मले कापूस येचाले जा लागते अन् जरा गायीकडं ध्यान दे. तिचं दूध कमी झालं. गवताचा भारा आना लागनं आज. येतानी आजीसाठी कंबरमोडीचा पालाबी आनजो. रातच्याले लावून देईल तिले.’’

मायचं बोलनं सुरू व्हतं. मी मातर झोपून व्हतो. मिनं फक्त कूस बदलोली. राती उसरा झोपल्यानं म्हाये डोये जरा भारीच वाटत व्हते. माय चाहा पऊन म्हांयाजवय आली अन् आंगावरची वाकय ओढत म्हनते कशी, ‘‘ऊठ नं रे पोरा, तिरप पडलं तरी उठाचा पत्ता नायी. ऊठ लौकर. कापूस येचाले जा लागते मले. अन् आठोनीनं देवराव भाल्याकून आजीसाठी कंबरीवरचा मलम घऊन येजो.’’

मंग मातर इलाज चालला नायी. मी उठून बसलो. आंगाले चांगल्या आयख्यापियख्या देल्ल्या. एक लंबीलचक जांभई दिऊन बाजीतून उठलो. वाकया घोडूसीवर ठिवून देल्ल्या. बाहीर आलो तं धुयार पडलं व्हतं. मले पाहून गाय हंबरली. वासरानंही शेपूट हलवलं. तिले पेंडीभर कडबा टाकला. तिच्या पाठीवर हात फिरवला. वासरापुढंही गवत टाकलं. मंग तांब्या घिऊन बाहीरकडं गेलो. कारन का घरी संडासाचं बांधकाम सुरू व्हतं; पन ठेकेदाराचा आजा गचकल्यानं चार दिसांपासून थे काम बंन व्हतं. सायेब लोक म्हनतं व्हते का, गाव हागनदारीमुक्त झालं पाह्यजे; पनं त्यायचेच मानसं काम करीत नोते. तिकून आलो तं गायीचं कडबा खाऊन झालं व्हतं. मंगश्यानं तिले बाहीर वडाच्या झाडाखाली बांधलं. वासराले थोडं मोकयं सोडलं. गायीचा कोठा झाडून काढला. कचºयाचं पह्यलं टोपलं फेकाले खदानीजवय आलो तं म्हां जिगरी दोस्त मन्या परसाकून येत व्हता. मी दिसलो तं थो थबकला, ‘‘गण्या, एक गोस्ट सांगाची हाये.’’
‘‘कोन्ती बे?’’ मिनं खराटा खाली ठेवत ईचारलं.
‘‘पह्यले तंबाकू घोट.’’
‘‘अबे, म्हायी डब्बी घरातच आजीच्या बाजीवर राह्यली. तुहीच डब्बी दे.’’
मन्यानं म्हां हाती डब्बी देल्ली. मिनं दोघापुरता तंबाकू घोटला. तवा मन्यानं सांगतलं, ‘‘गण्या, तुह्या राधाले पाव्हने येनार हाये पाहाले इतवारी.’’
मले एकदम बॉम्ब टाकल्यासारखं वाटलं.
‘‘तुले कोनं सांगतलं बे… अन् मले कसं मायीत नायी?’’ मनं त्याले ईचारलं.
‘‘तुले राधा भेटली व्हती का?’’
‘‘काल दुपारच्याले भेटली व्हती नदीवर.’’ मिनं सांगतलं.
‘‘मंग बरोबर हाये. काल राती तिचा बाप म्हंजे तुया मामा आला व्हता म्हां घरी, बापाले भेटाले. तवा मनं गोस्टी आयकल्या त्याईच्या. पाव्हने येनार हायेत म्हने वडगावचे.’’
‘‘…पन तुया घरी कसा काय?’’ म्हायी शंका.
‘‘अरे, म्हायी मोठी आका राह्यते तिथं. तिच्या घरासेजारीच ह्या पाव्हन्याचं घर हाये.’’
‘‘अस्सं व्हयं तं.’’
‘‘गण्या, कर लौकर कायीतरी. नायीतं राधा जाईन थ्या वडगावले.’’
‘‘बरं झालं मन्या, तुनं सांगतलं; नायीतर मी गाफिलच राह्यलो असतो. बाकीचं राधा भेटल्याबिगर समजनार नाय.’’

राधाचा बाप म्हा चुलतमामा असला तरी थो मले जवाई करून घेनार नोताच. कारन का मी जास्त शिकलोच नायी. वावरात काम करनाºयाले कोन पोरगी देईन? मायनं मले शायीतून काढून म्हां मोठं नुस्कान केलं व्हतं. काय करावं मले समजत नोतं. मंग मिनं भराभर कोठा खराट्यानं झाडून काढला. गायीले अन् वासराले खुट्याले बांधून ठेवलं. सर्व झाल्यावरं मंजनानं दात घासाले बसलो. मनात तं इचार राधाचेच सुरू व्हते. खकारून खकारून तोंड धुतलं. भितीले अटकून ठुल्या आरशात पाहून केसांतून कंगवा फिरोला. पांढरे-सफेद दात पाहून मनामंधीच हासलो. तसं मायचं लक्ष म्हाकडं गेलं. तिनं ईचारलं, ‘‘काहून हासतं रे गण्या?’’
‘‘काहून नायी वो. पांढरे दात पाहून हासलो.’’
‘‘बरं… बरं… हा च्याहा पे अन् पाटलीनच्या घराकडं जाऊन पाह्य. जातानी वर्षा मावशीले आलमारीतले पाचशे रूपये नेऊन दे. बचत गटाचे हायीती; अन् आजीच्या मलमाचंबी ध्यानात ठेव.’’ मायनं चुलीवर भाकरीच्या अंधनाचा गंज ठेवत सांगतलं.
पाटलीनचं नाव घेतल्याबरोबर मी उसयलो.
‘‘मी नायी जात वो, थ्या पाटलीनच्या घरी. काल थ्या पाटलीनच्या भास्यानं ‘श्या’ देल्ल्या मले, गांग्या बैलाच्या मांग धावलो तं.’’
‘‘काय रे गण्या, तू झिजला काय त्याच्या ‘श्या’नं. अन् तूनंबी काहून मारला झोडपां थ्या बैलाले?’’ मायनं उंडा चुरत ईचारलं.
‘‘अवो, लक्षीमे, तू काहून त्याच्या मांगं लागली.’’ आजीनं तुरीच्या शेंगाचे सोले काढत ईचारलं.
‘‘थो बैल राधाच्या मांग धावला व्हता.’’ मिनं सांगतलं.
‘‘तुले काहून राधाची जरा जास्तीच कदर येते?’’ मायनं म्हाकडं पाह्यत ईचारलं.
‘‘काहून नायी येनार! …अन् राधा तुहीच भासी व्हय ना!’’
‘‘हं…बरं…बरं, म्हाया शिदोरीचं फडकं घे.’’
तवरीक आजीनं तुरीचे सोले पाट्यावर वाटून देल्ले व्हते. मंग मायनं त्याले फोडनी देल्ली. त्याचा सुगंध साºया घरात पसरला व्हता. इकडं माह्या जिभेले पानी सुटलं. निरीपरी झाल्यावर मायनं शिदोरी बांधली. दूधबी तापून ठेवलं. मिनं पान्याची घड्डी भरून आनून ठुली.

मी तिथसाचं बसून व्हतो. मायचे हात भराभर काम करी व्हते. तिचं काम मी मोठ्या कौतिकानं पाहात व्हतो. किती कष्ट व्हती माय! तेवढ्यामंधी सरसोती मोठ्या मायनं अवाज देल्ला, ‘‘चाल वो, लक्ष्मे…झालं काय…उशीर हून राह्यला.’’
‘‘हो…हो…चाल…चाल. झालच माह्यं.’’ माय अंदरूनच बोल्ली.
‘‘घड्डी घेतली काय तुनं?’’ मायनं ईचारलं.
‘‘नायी वो लक्ष्मे, तुस्स घे. म्हायी घड्डी फोडली थ्या बोहाºयानं.’’
‘‘कोनं वो?’’ मायनं ईचारलं.
‘‘अवो, थो लायना जवाई आला व्हता दारू ढोस्सकून. थ्या बेबीच्या बचतगटाचे पैसे हा मुर्दाड मातीत घालते. आता म्हां लायना पक्या आला तं त्याची चांगली सोयच लावाले सांगतो.’’ सरसोती मोठी माय आता चांगलीच गरम झाली व्हती. दोघीचं इकडलं तिकडलं बोलनं झाल्यावर मायनं वाह्यना पायात सरकोल्या अन् जाता जाता मले ठनकोलच, ‘‘जाऊन पाह्यजो रे गण्या. थे पैसे अन् आजीचं कामबी ध्यानात ठेव.’’

मिनं फकस्त मान हालोली. तेवढ्यामंधी बायजा आजी आली. माय आत्ताच गेल्याचं सांगून मी आंगनातल्या निंबाच्या झाडाखाली बसून राह्यलो. मले आठोले थे दिवस…
म्हां बाप अन् आबाजीबी पाटलाच्याच कामावर व्हते. आबाजी देवाघरी गेल्यावर बापबी तिथसाच कामाले व्हता. म्हा बाप मोठ्या कष्टानं अन् इमानदारीनं वाड्यात राबत व्हता. मायबी पाटलाच्याच पाथीवर व्हती. तिदस्तासाली म्हां बाप एका लहानशा बिमारीनं देवाघरी गेला. तवा मी पाचव्या वर्गात शिकत व्हतो. तवा मायनं मले शायीतून काढूनच टाकलं अन् पाटलाच्या कामाले ठुलं. पाटील म्हने, गण्याने निदान म्यॅट्रिकपर्यंत तरी शिकव; पन मायनं कोनाचंच आयकलं नायी. पाटील मोठा सज्जन मानूस; पन पाटलीन बेज्जा घनानी अन् कंजूस व्हती. म्हायं तिच्यासंग अजिबाद पटत नोतं. कायीबायी चुगल्या करून थे मले मायच्या ‘श्या ’खाऊ घालत व्हती. म्हून म्हायी तिच्यासंग कामाची धरसोड व्हती.

(दुसरा भाग पुढील अंकात)
लेखकाचा संपर्क क्रमांक : 9552981514