शासन शहीद कुटुंबाच्या पाठीशी : गृहमंत्री अनिल देशमुख

उपराजधानी नागपूर

नागपूर : दोन महिन्यापूर्वी काश्मीर खोऱ्यात शत्रूंच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले काटोलचे वीर पुत्र शहीद भूषण सतई यांचा मृत्यू झाला. त्यामुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. या दुःखाच्या परिस्थितीत त्यांच्या कुटुंबियांना शासनाने आर्थिक मदत म्हणून वडील रमेश सतई व आई मीराबाई यांना प्रत्येकी 50 लाख अशी एक कोटी रुपयांची मदत केली आहे, असे गृहमंत्री अनिल देशमुख [ Home Minister Anil Deshmukh ] यांनी सांगितले. शासन शहीद कुटुंबांच्या पाठीशी सदैव उभे आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली.

जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्यावतीने काटोल येथील पोलीस स्टेशन परिसरात शहीद भूषण सत्ताई यांच्या कुटुंबीयांना एकूण 1 कोटी रुपयांची आर्थिक मदत शासनातर्फे देण्यात आली. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याहस्ते प्रतिकात्मक धनादेश देण्यात आला.

जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, पोलीस अधीक्षक (ग्रामीण) राकेश ओला, अतिरीक्त पोलिस अधीक्षक राहुल माकणीकर, उपविभागीय अधिकारी श्री.उंबरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी नरेश जाधव, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर श्रीमती शिल्पा खरपकर आदी यावेळी उपस्थित होते.

माजी सैनिकांना उद्देशून श्री. देशमुख म्हणाले, ग्रामीण भागातील विशेषतः नागपूर विभागातील तरुणांना सैन्य भरती होण्यासाठी प्रवृत्त करावे, तसेच त्यांना सर्व प्रकारची मदत करावी, आपल्या भागातील जास्तीत जास्त युवक-युवती सैन्यात भरती होतील, यावर माजी सैनिकांनी प्रयत्न करावेत, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमात सैन्यात अतुलनीय कामगिरी करणाऱ्या माजी सैनिक रवींद्र वानखेडे, विष्णू गोटे, नंदकुमार कोरडे, जयवंत चाकोले, अमोल राऊत यांचा गृहमंत्री देशमुख यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी शिल्पा खरपकर यांचाही सत्कार केला. या कार्यक्रमास शहीद भुषण सतई यांचे कुटुंबीय, माजी सैनिक, पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *