सिंचनाची अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करावीत : जयंत पाटील

विदर्भ

अमरावती : जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांची प्रलंबित कामे गतीने पूर्ण करण्याचे निर्देश जलसंपदा व लाभक्षेत्र मंत्री जयंत पाटील यांनी सिंचन विभागातील अधिकाऱ्यांना दिले.

जलसंपदा मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील सिंचनकामांबाबत बैठक विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यालयात आज झाली, त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला आमदार सुलभाताई खोडके, आमदार बळवंतराव वानखेडे, माजी आमदार वीरेंद्र जगताप, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश संजय खोडके, विभागीय पाटबंधारे विकास महामंडळ नागपूरचे कार्यकारी संचालक राजेंद्र मोहिते, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता अनिल बहादूरे, विशेष प्रकल्प अधिकारी आशिष देवगडे, ऊर्ध्व वर्धा सिंचन मंडळाच्या अधीक्षक अभियंता रश्मी देशमुख आदी उपस्थित होते.

जलसंपदा मंत्री श्री.पाटील यांनी सिंचन प्रकल्प, पुनर्वसन आदी विविध बाबींचा आढावा घेतला. दर्यापूर येथील चंद्रभागा बॅरेज प्रकल्पामुळे बाधित झालेल्या 73 कुटुंबाचे पुनर्वसन प्राधान्याने करण्यात यावे. मोर्शी येथील निम्न चारगड लघू पाटबंधारे प्रकल्पाअंतर्गत खोपडा व बोडणा गावाचे पुनर्वसन करण्याबाबतच्या प्रस्तावाची कार्यवाही पूर्ण करावी.सिंचन प्रकल्प पूर्णत्वास नेत असताना भूसंपादनाची विविध प्रकरणे तातडीने सोडवावी. असे निर्देश त्यांनी दिले.

बळीराजा जलसंजीवनी योजनेअंतर्गत अठरा लघू प्रकल्पांचा समावेश करण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी 2 हजार 115 कोटी रुपयांची सुधारित प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. वर्षनिहाय आर्थिक नियोजनातून प्रकल्प पूर्ण करावा. मार्च 2020 पर्यंत बरीच कामे पूर्ण करण्यात आले असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. जिल्ह्यातील हे अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण करून सिंचनाखाली क्षेत्र वाढवावे, असे श्री पाटील यांनी सांगितले.

विभागातील भगाडी,करजगाव,बागलिंगा, पाकनदी, सोनगाव,वाघाडी, सामदा,चंद्रभागा बॅरेज, रायगड, बोरनदी, टाकळी कलान,निम्न साखळी, निम्न चारगड, भीमडी, झटामझिरी, आमपाटी,चांदी नदी, टीमटाला या प्रकल्पांची कामे पूर्ण करून सिंचनक्षमतेचे उद्दिष्ट पूर्ण करावे असेही निर्देश त्यांनी दिले. बळीराजा जलसंजीवनी योजनेअंतर्गत येणारे अठरा प्रकल्प म्हणजे वरुड येथील पाक नदी प्रकल्प, भीमडी नदी प्रकल्प, दर्यापूर येथील सामदा लघु प्रकल्प, निम्न पेढी प्रकल्पाची सद्य:स्थिती आदी आढावा घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *