Home मनोरंजन ... चित्रपट,संगीत,नाटक,नृत्य अभिनेते रमेश भाटकर यांचा दुसरा स्मृतिदिन

अभिनेते रमेश भाटकर यांचा दुसरा स्मृतिदिन

170

आपल्या दमदार अभिनयाने सुमारे ३० वर्षे मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीवर दबदबा राखणारे ज्येष्ठ अभिनेते रमेश भाटकर [ ramesh bhatkar ] यांचा आज गुरुवारी दुसरा स्मृतिदिन. ४ फेब्रुवारी २०१९ रोजी ६९ व्या वर्षी मुंबईतील एलिझाबेथ रुग्णालयात त्यांचे निधन झाले.

रमेश भाटकर हे प्रसिद्ध संगीतकार, गायक स्नेहल भाटकर यांचे सुपुत्र. त्यांचा जन्म ३ आॅगस्ट १९४९ रोजी कोल्हापुरात झाला. त्यांनी अनेक चित्रपट, मालिकांमध्ये काम केले असले तरी रंगभूमी ही त्यांची पहिली पसंती होती. अभिनयाच्या कारकिर्दीचा प्रारंभही रंगभूमीवरूनच झाला. ‘अश्रूंची झाली फुले’ हे त्यांचे नाटक खूप गाजले. (भूमिका लाल्या) केव्हातरी पहाटे, अखेर तू येशीलच, राहू केतू, मुक्ता ही गाजलेली नाटके. सन १९७७ मध्ये ‘चांदोबा चांदोबा भागलास का’ या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटात अभिनय सुरू केला. यानंतर त्यांनी अष्टविनायक (सचिन पिळगांवकर यांच्यासोबत), दुनिया करी सलाम, आपली माणसं (अशोक सराफ यांच्यासोबत) आदी चित्रपटांमध्ये भूमिका केल्या.

दूरदर्शनवर रमेश भाटकरांची ‘हॅलो इन्स्पेक्टर’ ही पोलिसी मालिका खूप गाजली. यांचा भारदस्त आवाजातील जरब ही अभिनयात ‘प्लस’ ठरली.
‘तिसरा डोळा’ मालिकेमधील गुप्तहेराच्या भूमिकेनेही त्यांना खास ओळख दिली. ‘माहेरची साडी’ हा चित्रपट त्यांच्या कारकिर्दीत सुपरहिट म्हणावा लागेल. यात विक्रम गोखले, अलका कुबल, अजिंक्य देव यांची भूमिका आहे. ९८ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनामध्ये रमेश भाटकर यांना ‘जीवनगौरव’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते.

काही चित्रपट
सख्खा भाऊ पक्का वैरी
दे टाळी
लपवाछपवी
जय देव
बंधन
सोबती
हमाल दे धमाल
दुनिया करी सलाम
रंगत संगत
आई पाहिजे
काय द्याचे बोला
सातच्या आत घरात
सरकारनामा