Home उपराजधानी नागपूर नाना पटोलेंच्या निवडीने काँग्रेसचा विदर्भावर अधिक विश्वास

नाना पटोलेंच्या निवडीने काँग्रेसचा विदर्भावर अधिक विश्वास

196

शिल्पा वकलकर

नागपूर : प्रदेशाध्यक्षपदासह काँग्रेस नेतृत्वाने विदर्भाच्या वाट्याला अन्य दोन महत्त्वाची पदे दिली आहेत. यात माजी विधानसभा अध्यक्ष तसेच आमदार नाना पटोले, ज्येष्ठ नेते शिवाजीराव मोघे आणि माजी मंत्री तसेच विद्यमान आमदार रणजीत कांबळे यांचा समावेश आहे.
यातून मागील काही वर्षात विदर्भात माघारलेल्या पक्षाला पुढे आणण्याचा प्रयत्न साधण्यात येणार असल्याचे दिसून येते.

नाना पटोले यांची शुक्रवारी महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. त्यापूर्वी 4 फेब्रुवारी त्यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर काँग्रेस पक्षाने पत्रक काढून नाना पटोले यांची महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याची माहिती दिली. याशिवाय सहा कार्यकारी अध्यक्ष आणि 10 उपाध्यक्षांचीही नेमणूक करण्यात आली आहे. यात आमदार प्रणिती शिंदे यांच्यासारख्या युवानेत्यांनाही संधी देण्यात आली आहे.

सहा कार्यकारी अध्यक्षांमध्ये
शिवाजीराव मोघे (विदर्भ -यवतमाळ), बसवराज पाटील, मोहम्मद आरीफ नसीम खान, कुणाल रोहिदास पाटील, चंद्रकांत हांडोरे आणि प्रणिती सुशीलकुमार शिंदे यांचा समावेश आहे.

याशिवाय 10 उपाध्यक्षांमध्ये
शिरीष मधुकरराव चौधरी, रमेश आनंदराव बागवे, हुसेन दलवाई, मोहन जोशी, रणजीत प्रताप कांबळे (विदर्भ- वर्धा), कैलास कृष्णराव गोरंट्याल, बी. आय. नगराळे, शरद आहेर, एम. एम. शेख, माणिक मोतीराम जगताप यांची उपाध्यक्षपदी नेमणूक झाली आहे. हेच नाही महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसमध्ये 37 जणांचे संसदीय मंडळ नियुक्त करण्यात आले असून, यातही विदर्भाला झुकते माप मिळाल्याचे दिसून येते़ यात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, ज्येष्ठ नेते मुकुल वासनिक, ज्येष्ठ नेते अविनाश पांडे, माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे, विद्यमान मंत्री विजय वडेट्टीवार, मंत्री नितीन राऊत, मंत्री यशोमती ठाकूर, मंत्री सुनील केदार, ज्येष्ठ नेते वसंत पुरके आणि सुरेश धानोरकर यांचा समावेश आहेत.

प्रदेशाध्यक्ष निवडीनंतर नाना पटोले यांनी माध्यमासोबतच्या वक्तव्यात काँग्रेसला क्रमांक एकचा पक्ष करणार असल्याचा निर्धार व्यक्त केला. जिल्हा पातळीवर काही बदल केला जाईल. गटातटाचे राजकारण टाळण्यावर कटाक्ष असेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

रोख आणि ठोक
नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे काम वेगळ्या धर्तीवरचे आहे़ त्यांनी आपले काम नेहमीसाठी रोख आणि ठोक असे ठेवले आहे़ अगदी ग्रामीण पातळीपासून वरच्या नेतृत्वापर्यंतच्या राजकारणाची त्यांना जाण आहे़ ते शेतकरीनेतेही आहेत. त्यांची काम करण्याची धडपड अनेकांनी अनुभवली आहे. त्यामुळे विदर्भात आपल्या पक्षाची पाळेमुळे अधिक खोलवर रुजवण्यास ते कमी पडणार नाहीत, असे म्हणता येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here