Home नागपूर संस्कृत भाषेच्या संवर्धनासाठी राज्यात विश्वविद्यालयाची चार उपकेंद्र स्थापन करणार

संस्कृत भाषेच्या संवर्धनासाठी राज्यात विश्वविद्यालयाची चार उपकेंद्र स्थापन करणार

35

नागपूर : संस्कृत भाषेच्या संवर्धन आणि विकासासाठी कवि कुलगुरु कालिदास संस्कृत विश्व विद्यालयाची चार उपकेंद्र राज्यात लवकरच स्थापन करण्यात येईल. या उपकेंद्राच्या माध्यमातून राज्याच्या कानाकोपऱ्यात संस्कृत भाषेच्या शिक्षणाचा प्रचार व प्रसार करण्यात येईल, असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत [ samant in ramtek ] यांनी आज केले.

रामटेक येथील कवि कुलगुरु कालिदास संस्कृत विश्व विद्यालयाच्या परिसरातील  मातोश्री वसतिगृहाचे लोकार्पण तसेच येथील क्रीडांगणाचे उद्घाटन श्री. सामंत यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती.

आमदार आशिष जयस्वाल, महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाचे कुलगुरु विजेंद्रकुमार, कवि कुलगुरु कालिदास संस्कृत विश्व विद्यालयाचे कुलगुरु श्रीनिवास वरखेडी, कुलसचिव सी. जी. विजयकुमार, राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियानाचे (रुसा) संचालक पंकजकुमार, उच्च व तंत्रशिक्षण नागपूर विभागाचे संचालक धनराज माने, तंत्रशिक्षण संचालक अभय वाघ, सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रमुख अभियंता संजय दशपुते, विश्वविद्यालयाचे उपअभियंता संतोष वाडीकर तसेच माजी आमदार मल्लिकार्जून रेड्डी, आनंदराव देशमुख आदी उपस्थित होते.

कवि कुलगुरु कालिदास संस्कृत विश्व विद्यालय रचनात्मक कामांचे केंद्र बनावे. यासाठी शासन विद्यापीठाला पूर्ण सहकार्य करेल. या विश्व विद्यालयाच्या धर्तीवर राज्यातील कानाकोपऱ्यामध्ये संस्कृत भाषा जनसामान्यापर्यंत पोहचावी यासाठी संस्कृत भाषेचे चार उपकेंद्र लवकरच स्थापन करण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल. गेल्या पाच वर्षांतील प्रलंबित राहिलेले महाकवि कालिदास संस्कृत साधना पुरस्कार पुढील महिन्यात रामटेक येथे एका विशेष समारंभात प्रदान करण्यात येतील. संस्कृत भाषेच्या विद्वानांना हा पुरस्कार देण्यात येत असतो. यानंतर दरवर्षी हा पुरस्कार कालिदास समारोहात सन्मानाने प्रदान करण्यात येईल. जेणेकरुन स्थानिक लोकांना या पुरस्कारापासून प्रेरणा मिळेल, असे श्री. सामंत यावेळी म्हणाले.

विश्वविद्यालयातील मातोश्री वसतिगृहामुळे विद्यार्थिनींसाठी निवासाची उत्तम सोय झाली आहे. मातेच्या वत्सलतेने विद्यार्थिनींना जपणाऱ्या मातोश्री वसतिगृहाचे नाव यापुढे शासकीय मुलींच्या वसतिगृहाला देण्यात येईल, असेही ते म्हणाले. विश्वविद्यालय हे संस्कृत भाषा प्रचार आणि प्रसार करण्याचे कार्य उत्तमरित्या करीत असल्याचे समाधान त्यांनी यावेळी व्यक्त केले.

नागरी परीक्षांमध्ये संस्कृत तसेच पाली भाषेचाही समावेश असल्यामुळे कवि कुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालयामार्फत संस्कृत भाषेसह या भाषांच्या संवर्धनासाठीही प्रयत्न करावे. येथे पारंपारिक शिक्षणासोबतच आधुनिक शिक्षणावर भर देण्याची कार्यवाही सुरु आहे. विश्वविद्यालयामध्ये सर्वसामान्यांना परवडेल असे शुल्क आकारण्यात येते. यामुळे दुर्गम भागातील विद्यार्थ्यांनाही संस्कृत भाषेचे ज्ञान सहजरित्या प्राप्त होते. येथे स्थापन करण्यात आलेल्या मातोश्री वसतिगृहात मुलींच्या निवासाची सोय करण्यात आली आहे. निवासाची सोय झाल्यामुळे येथील मुलींच्या शिक्षणात खंड पडणार नाही, असा विश्वास डॉ. राऊत यांनी व्यक्त केला.

विश्वविद्यालयाने पाली, प्राकृत तसेच इतर भाषांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी अभ्यासक्रमाची निर्मिती करावी. तसेच महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायद्यामध्ये संस्कृत विश्वविद्यालयाने सहभागी व्हावे, यामुळे विद्यापीठाच्या कक्षा तर रुंदावतीलच शिवाय विद्यार्थ्यांनाही विविध संधी उपलब्ध होतील, असेही ते म्हणाले.

मातोश्री वसतिगृहात 60 खोल्या असून येथे 180 विद्यार्थिनींची निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच येथील नवनिर्मित क्रीडांगणामध्ये 200 मीटरचा रनिंग ट्रॅक, कबड्डी, व्हॉली बॉल, खो-खो, क्रिकेट इत्यादी क्रीडा प्रकारांची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती श्री. वरखेडी यांनी दिली.

प्रारंभी गुरुकुलम येथील गोळवलकर गुरुजी तसेच ज्ञानयोगी श्रीकांत जिचकार यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन आधुनिक भाषा विभाग प्रमुख प्रा. पराग जोशी यांनी . आभार शैक्षणिक परिसराच्या संचालक प्रा. कविता होले यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here