Home प्रादेशिक पश्चिम महाराष्ट्र 10 जिल्हास्तरावर जलधारक नकाशे, जलधरांचे व्यवस्थापन आराखडे यांना मान्यता

10 जिल्हास्तरावर जलधारक नकाशे, जलधरांचे व्यवस्थापन आराखडे यांना मान्यता

63

पुणे : भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या सहकार्याने केंद्रीय भूमिजल मंडळ (नागपूर) यांच्याद्वारे तयार करण्यात आलेल्या सातारा, सोलापूर, अहमदनगर, नंदूरबार, बीड, हिंगोली, नांदेड, परभणी, नागपूर, वर्धा या 10 जिल्ह्यांचे जलधारक नकाशे व जलधरांचे व्यवस्थापन आराखडे यांना मान्यता देण्यात आली.

केंद्रीय भूमिजल मंडळाद्वारे ‘नॅशनल अक्विफर मॅपिंग’ [ national aquifier mapping ]  या प्रकल्पातंर्गत राज्यातील जलधारकांचे नकाशे तयार करण्याचे काम करण्यात येत आहे. या प्रकल्पाची बैठक भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या पुणे येथील मुख्यालयी डॉ. संजय चहांदे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.

भूजल पुनर्भरणाच्या योजनांसोबतच भूजल बचतीच्या उपाययोजना राबविणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन डॉ. संजय चहांदे यांनी केले.

आजच्या परिस्थितीत ग्रामीण पाणीपुरवठा तसेच शेती भूजलावर अधिक अवलंबून आहे. त्यामुळे अनेक भागात भूजलाचा उपसा वाढून भूजल टंचाई निर्माण होत आहे. या अनुषंगाने भूजल उपलब्धतता वाढविण्याकरीता व टिकविण्याकरीता आवश्यक असलेल्या पुनर्भरणासाठी तसेच भूजल व्यवस्थापनासाठी राज्याची भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा त्याचबरोबर केंद्र शासनाचे केंद्रीय भूमिजल मंडळ नागपूर [ Central Ground Water Board,Nagpur ]  समन्वयाने सतत कार्यरत आहे. जलधारकांच्या जलव्यवस्थापन आराखड्यात भूजलाची उपलब्धतता वाढविण्यासाठी भूजल पुनर्भरणाच्या उपाययोजनांसोबत भूजल बचतीच्या उपाययोजनांचा समावेश करण्यात आलेला आहे. भूजल पुनर्भरणाच्या योजनांमुळे 10 ते 12 टक्क्यांपर्यंत भूजल वाढू शकते. जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी कार्यालय जलसंधारणाच्या उपाययोजना राबविणाºया यंत्रणांचा समन्वय साधून उपाययोजना राबवितांना या आराखड्यांचा उपयोग करू शकतात. तसेच, पाणी बचतीच्या उपाययोजना म्हणजे ठिबक व तुषार सिंचन यासारख्या उपाययोजना राबविल्यामुळे 25 ते 30 टक्के पर्यत भूजलाची बचत होऊ शकते. त्याचप्रमाणे ठिबक व तुषार सिंचन या सूक्ष्म सिंचन पद्धतीमुळे पिकांचे उत्पन्न सुद्धा वाढते असे काही अभ्यासांमध्ये निदर्शनास आले आहे. यातून सूक्ष्म सिंचनाचे क्षेत्र वाढविण्याची गरज अधोरेखीत होते, अशी माहिती देण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here