Home राजधानी मुंबई कुसुमाग्रजांच्या कविता वाचन उपक्रमात सहभागी होण्याची संधी

कुसुमाग्रजांच्या कविता वाचन उपक्रमात सहभागी होण्याची संधी

216

नवी दिल्ली : ‘मराठी भाषा गौरव दिन’ या ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त कवी वि.वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रजांच्या जयंती दिनानिमित्त महाराष्ट्र परिचय केंद्राने कुसुमाग्रजांच्या कविता वाचनाचा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन साहित्य रसिकांना करण्यात येत आहे.

राजधानी दिल्लीतून राज्य शासनाच्या प्रसिद्धी विषयक कामांसह मराठी भाषा व महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख दर्शविणारे कार्यक्रम व उपक्रम राबविण्यासाठी महाराष्ट्र परिचय केंद्राची खास ओळख आहे. वि.वा.शिरवाडकरांनी मराठी साहित्यात दिलेल्या भरीव योगदानाचा कृतज्ञभाव व्यक्त करण्यासाठी मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधत परिचय केंद्राने त्यांच्या कविता वाचन उपक्रमाचे आयोजन केले आहे. मराठी भाषा अवगत असणाऱ्या सर्व नागरिकांनी या उपक्रमात सहभागी होवून कुसुमाग्रजांच्या कविता पुन्हा जनतेपर्यंत पोहचावे या उद्देशाने परिचय केंद्राने हा उपक्रम आखला आहे. उत्तम सादरीकरणास परिचय केंद्राच्या समाजमाध्यमांद्वारे प्रसिद्धी देण्यात येणार आहे.

मराठी भाषा गौरव दिन आणि कुसुमाग्रज

विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचे महाराष्ट्राच्या साहित्यिक, सांस्‍कृतिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय योगदान आहे. एक श्रेष्ठ आधुनिक मराठी कवी, नाटककार व कादंबरीकार म्हणून त्यांची ख्याती आहे. ‘कुसुमाग्रज’ या टोपण नावाने त्यांनी काव्यलेखन केले. प्रसिद्ध साहित्यिक वि.स.खांडेकरांनंतर मराठी साहित्याला ज्ञानपीठ पुरस्कार मिळवून देणारे ते दुसरे मराठी साहित्यिक. कुसुमाग्रजांच्या स्मृतिला अभिवादन म्हणून महाराष्ट्र शासनातर्फे त्यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. वि.वा शिरवाडकरांचे एकूण २४ कविता संग्रह, ३ कादंबऱ्या, १६ कथा संग्रह, १९ नाटके, ५ नाटिका व एकांकी आणि ४ लेखसंग्रह आदी साहित्य प्रसिद्ध आहे. १९६४ मधील गोव्याच्या महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. १९७४ मध्ये त्यांच्या नटसम्राट ह्या नाटकाला साहित्य अकादमीचे पारितोषिक मिळाले तर याच कलाकृतीला १९८७ मध्ये ज्ञानपीठ पुरस्कारही मिळाला.

या कविता संग्रहातील कविता वाचनाचे आवाहन

कुसुमाग्रजांचे एकूण २४ कविता संग्रह प्रकाशित आहेत. यामध्ये जीवनलहरी, विशाखा, समिधा, किनारा, मेघदूत अनुवाद, मराठी माती, स्वगत, जाईचा कुंज बालांसाठी कविता, हिमरेषा , वादळवेल, रसयात्रा, छंदोमयी, मुक्तायन, श्रावण, प्रवासी पक्षी, पाथेय, बालबोध मेव्यातील कुसुमाग्रज, माधवी, महावृक्ष, करार एका ताऱ्याशी, चाफा, मारवा, अक्षरबाग, थांब सहेली या काव्यसंग्रहांचा समावेश आहे. कुसुमाग्रजांच्या या २४ काव्य संग्रहातील निवडक कविता व्हिडीओ स्वरूपात या कार्यालयास पाठव्यात. सुस्पष्टोच्चार व उत्तम सादरीकरण असणाऱ्या कविता वाचनाची कार्यालयाच्या संपादन मंडळाकडून निवड झाल्यावर आमच्या ट्विटर, फेसबुक, युट्यूब, इन्स्टाग्राम आदी माध्यमांद्वारे प्रसिद्धी देण्यात येईल.

कविता वाचनाऱ्या व्यक्तीने स्वत:चा अल्प परिचय, कुसुमाग्रजांची ज्या कवितेचे वाचन करणार आहात त्या कवितेचे शिर्षक व कविता संग्रहाचे नाव याची थोडक्यात माहिती द्यावी. कार्यालयाच्या वतीने १४ ते २७ फेब्रुवारी २०२१ या कालावधीत कुसुमाग्रजांच्या कविता वाचनाचे व्हिडीओ प्रसारीत करण्यात येणार आहेत. व्हिडीओ निवडीचे संपूर्ण अधिकार कार्यालयाच्या संपादन मंडळाकडे असतील. तेव्हा कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या कविता वाचनाचे व्हिडीओ तयार करून आम्हाला पाठवा. ९८९९११४११३० आणि ९८७१७४२७६७ या व्हॉट्सअप क्रमांकांवर रचना पाठविण्याचे आवाहन महाराष्ट्र परिचय केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.