Home राजधानी मुंबई महाराष्ट्र राज्यातील हस्तकलेला मिळणार आंतराष्ट्रीय बाजारपेठ

महाराष्ट्र राज्यातील हस्तकलेला मिळणार आंतराष्ट्रीय बाजारपेठ

39

मुंबई : महाराष्ट्र राज्यातील हस्तकला व हातमाग कारागिरांच्या वस्तुंना आता आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळण्याची दारं उघडी झाली आहेत. ऑनलाईन विक्री करणारी आघाडीची कंपनी मे. फ्लिपकार्ट यांच्या माध्यमातून ही संधी उपलब्ध झाली आहे. फ्लिपकार्टच्या ‘समर्थ’ या कार्यक्रमांतर्गत ऑनलाईन विक्री व्यासपीठावर विक्री करण्यासाठी महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळ मर्यादित व महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ यांनी मे. फ्लिपकार्ट यांच्यासोबत नुकताच याबाबत करार केला आहे.

उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या नेतृत्वात झालेल्या या सामंजस्य करारानुसार आता पैठणी साडी, सावंतवाडी लाकडी खेळणी, हिमरु शाली अशा वेगवेगळ्या हस्तकला जागतिक पातळीवर विक्री करता येतील. या कार्यक्रमांतर्गत हस्तकला व हातमाग कारागिरांनी त्यांच्या वस्तु या ऑनलाईन विक्री व्यासपीठावर विक्रीस ठेवल्यास पहिल्या सहा महिन्यापर्यंत मे. फ्लिपकार्ट यांच्यामार्फत कोणतेही कमिशन आकारण्यात येणार नाही. या वस्तुंचे उत्पादन करणाऱ्या कारागिरांना त्यांच्या 100 वस्तुंपर्यंत फोटोग्राफी विनाशुल्क करण्यात येणार आहे. याशिवाय कारागीरांना त्यांच्या वस्तुंची ऑनलाईन विक्री व पॅकेजिंग करण्याचे प्रशिक्षण विनाशुल्क देण्यात येणार आहे. या कार्यक्रमांतर्गत ऑनलाईन विक्रीची सुरुवात महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळ मर्यादित यांच्या मऱ्हाटी महाराष्ट्र विक्रीदालन, जागतिक व्यापार केंद्र, कफ परेड, मुंबई येथून करण्यात येणार आहे.

या ऑनलाईन व्यापक स्वरुपाच्या बाजारपेठेत हस्तकला व हातमाग कारागीरांनी उपलब्ध होत असलेल्या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन राज्यशासनाने केले आहे.सामंजस्य करारादरम्यान उद्योगमंत्री सुभाष देसाई, उद्योग राज्यमंत्री कुमारी आदिती तटकरे, उद्योग विभागाचे प्रधान सचिव बलदेव सिंह, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नीलिमा केरकट्टा, महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रवीण दराडे आदी उपस्थित होते. तसेच फ्लिपकार्ट समुहाचे मुख्य कॉर्पोरेट कामकाज अधिकारी व वरिष्ठ उपाध्यक्ष रजनीश कुमार हे व्हीडिओ कॉन्फरसिंगद्वारे नवी दिल्ली येथून सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here