Home उपराजधानी नागपूर दोन वर्षात फिरते पशुचिकित्सा रुग्णालय होणार : सुनील केदार

दोन वर्षात फिरते पशुचिकित्सा रुग्णालय होणार : सुनील केदार

71

नागपूर : पशुधनाला शेतकºयांच्या बांधावर नाममात्र शुल्कात वेळेत उपचार मिळावेत, यासाठी पशुसंवर्धन विभागाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून राज्यातील प्रत्येक तालुक्यात २०२२ पर्यंत फिरते पशुवैद्यकीय रुग्णालय सुरू करणार असल्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास व्यवसाय व मत्स्यव्यवसाय मंत्री सुनील केदार यांनी आज येथे सांगितले.

उपक्रमांतर्गंत नागपूर विभागात १५ फिरत्या पशुवैद्यकीय रुग्णालयांचा जिल्हा परिषद प्रांगणात हिरवी झेंडी दाखवून प्रारंभ करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

जिल्हा परिषद अध्यक्ष रश्मी बर्वे, मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आशिष पातूरकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कमलकिशोर फुटाणे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. मंजुषा पुंडलिक, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमिला जाखलेकर आदी उपस्थित होते.

पहिल्या टप्प्यात नागपूर विभागात फिरत्या १५ पशुवैद्यकीय रुग्णालयांचा प्रारंभ करण्यात आला असून, यातील तीन रुग्णालये जिल्ह्यात असतील. त्यामुळे पशुपालकांची मोठी गैरसोय दूर होणार आहे. पशुसंवर्धन विभागाने रुग्णालये सुरू करून नवीन पर्वाला प्रारंभ केला आहे. शेतकरी, पशुपालकांचे पशुधन निरोगी ठेवण्याला या विभागाने महत्त्व दिले आहे. ग्रामीण अर्थव्यवस्था ही कृषी आणि कृषिपूरक व्यवसायावर अवलंबून आहे. त्यामुळे फिरते पशुवैद्यकीय रुग्णालये ही विभागाची नितांत गरज होती. ती पूर्ण करत असल्याचे सांगून येत्या दोन वर्षात राज्यातील प्रत्येक तालुक्यात ही रुग्णालये होणार असल्याचे श्री. केदार यांनी सांगितले.

ग्रामीण भागात अशा प्रकारची रुग्णालये सुरु करत असून अद्यापही अशी रुग्णालये प्रत्येक गावात नाहीत. त्यामुळे आजारी पशुधनाला रुग्णालयापर्यंत नेणे मोठे अडचणीचे असते. १९६२ या नि:शुल्क क्रमांकावर संपर्क साधला असता वैद्यकीय पथकासह हे फिरते रुग्णालय बांधावर पोहचेल, असे श्री. केदार म्हणाले.

अफवांमुळे जास्त नुकसान

राज्यात बर्ड फ्ल्यू आटोक्यात आला असून, बर्ड फ्ल्यूने माणसांना कोणताही धोका नाही. अद्याप या आजाराने कोणीही दगावला नाही, असे सांगून श्री. केदार यांनी एका पक्षाला बर्ड फ्ल्यूची लागण झाल्यास 48 तासात त्याच्या पोल्ट्री फार्मचे मोठे नुकसान होते. मात्र त्यापेक्षा जास्त नुकसान समाजमाध्यमांवरील अफवांमुळे होते. भारतीय खाद्यसंस्कृती ही जगात सर्वाधिक सुरक्षित असून, पूर्णत: शिजविलेले चिकन बिनधास्त खाण्याचे आवाहनही त्यांनी केले.