स्वातंत्र्यानंतर प्रथमच गडचिरोलीमध्ये शांततेत मतदान,जिल्हा पोलीस विभागाचे कौतुक

उपराजधानी नागपूर विदर्भ

नक्षलदृष्ट्या दुर्गम, अतिदुर्गम व नक्षल बहुल आदिवासी भागात यापूर्वी नक्षलवाद्यांच्या दहशतीने ग्रामपंचायत मतदान झालेच नव्हते. अशा मौजा जवेली खुर्द गावात ५४ वर्षांनंतर पहिल्यांदाच निवडणूक झाली. नक्षलवाद्यांच्या भीतीला न जुमानता लोकांनी भरभरून मतदान केले.

नागपूर : गडचिरोली जिल्ह्यातील सन २०२१ ची ग्रामपंचायत निवडणूक मतप्रक्रिया १२ तालुक्यामध्ये दोन टप्यात ९२० मतदान केंद्रावर घेण्यात आली. ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया कोणत्याही प्रकारचा घातपात न होता, शांततेत संपन्न झाली. ज्यायोगे लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी पोलीस विभागाची महत्त्वपूर्ण साथ लाभली, त्याबद्दल गृहमंत्री अनिल देशमुख [ Home Minister Anil Deshmukh ] यांनी गडचिरोली जिल्हा पोलीस विभागाचे मनःपूर्वक कौतुक केले आहे.

नक्षलवाद्यांच्या विचारसरणीचा अंत
गडचिरोली जिल्हा हा अतिदुर्गम व नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशील जिल्हा म्हणून परिचित आहे. निवडणुका म्हटले की, लोकशाही व शासनविरोधी कृत्य करण्यास नक्षलवाद्यांना संधी मिळते. पण त्यावर मात करून गडचिरोली पोलीस दलाच्या इतिहासात कधी नव्हे ते पहिल्यांदाच ग्रामपंचायत निवडणुकीत [ GADCHIROLI GRAM PANCHAYAT ELECTION ] नवा विक्रम केला. हा जिल्हा नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशिल व अतिदुर्गम गणला जावुन सुध्दा पोलीस दलाचे अथक परिश्रमाने व जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने ग्रामपंचायत निवडणुका कोणताही घातपात न होवु देता शांततेत संपन्न झाल्या. हे पाहता गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवादी विचारसरणीचा अंत होत आहे, असेही गृहमंत्र्यांनी म्हटले आहे.

विक्रमी मतदान
निवडणूक पहिला टप्पा १५ जानेवारी २०२१ व दुसरा टप्पा २० जानेवारी २०२१ अशा प्रकारे घेण्यात आली. जनतेने नक्षलवाद्यांच्या धमक्यांना व त्यांच्या दहशतीला न जुमानता, त्यांच्या कोणत्याही आमिषाला बळी न पडता उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. कधीही नव्हे ते गडचिरोली जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात ८२.०६ टक्के तसेच दुसऱ्या टप्प्यात ८०.०१ टक्के असे विक्रमी मतदान झाले. यात महत्त्वाचे म्हणजे पुरूषांच्या खाद्यांला खांदा लावुन स्त्रियांनी ८१.१९ टक्के मतदानाचा हक्क बजावुन विक्रम नोंदविला. व पुरूषांनी सुध्दा ७४.३७ टक्के मतदान करून मतदान प्रक्रियेमध्ये मोलाचा सहभाग नोंदविला.

कौतुकास्पद कामगिरी
यावर्षीच्या ग्रामपंचायत निवडणुकीत गडचिरोली पोलीस दलाने जिल्ह्यातील नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशिल १७७ व संवेदनशिल ३७७ तसेच सामान्य ५२७ अशा अतिदुर्गम भागात असलेल्या निवडणूक बुथवर मतदान प्रक्रियेचे साहित्य मतदान प्रक्रियेतील कार्यरत अधिकारी व कर्मचारी यांना जंगलातून वाट काढत पहिल्या टप्प्यातील १८१ निवडणूक बुथवर ११६८ किलोमीटर तसेच दुसऱ्या टप्प्यातील १८६ निवडणूक बुथवर १९७८ किलोमीटरचा पायी प्रवास करून आणि १२२ अतिसंवेदनशील बुथवर हेलिकॉप्टरद्वारे सुरक्षितपणे पोहोचविले. ही मोठी कौतुकास्पद अशी कामगिरी केली.

पोलीस उपमहासंचालक गडचिरोली परिक्षेत्र संदीप पाटील व जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनात पोलीस प्रशासनाने नियोजनात्मक पध्दतीने कोणताही अनुचित प्रकार घडू न देता मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्यात मोलाची भूमिका बजावली आहे. सदर बाब ही नक्कीच पोलीस विभागाची मान उंचावणारी आहे. याचेही गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कौतूक केले.

 

 


 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *