नागपूर : विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टीच्या काही भागात बुधवारी अवकाळी पाऊस कोसळला. नागपूर, बुलडाणा, वाशिम, अकोला, गोंदियात पडलेल्या या अवकाळी पावसाचा फटका गहू पिकाला बसण्याची भीती व्यक्त होत आहे.
मराठवाड्यात अनेक ठिकाणी तसेच सांगली, सातारा, सोलापूरमध्येही विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडला. हवामान खात्याने आज मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणात तुरळक ठिकाणी अवकाळी पावसासह गारपिटीची शक्यता आहे.
दुसरीकडे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. येत्या दोन दिवसात मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी तर मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल, असे हवामान विभागाने म्हटले आहे.