इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू करण्यास स्थायी समितीने मंजुरी

उपराजधानी नागपूर

नागपूर : शहरात प्रत्येक विधानसभा मतदारसंघात एक अशा एकूण सहा इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू करण्यासंदर्भात स्थायी समितीने मंजुरी प्रदान केली आहे. बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीत संबंधित विषयावर चर्चा करून सदस्यांनी एकमताने मंजुरी दिली.
स्पर्धेच्या युगात आज इंग्रजी माध्यमाच्या शिक्षणाची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे पालकांचा कल इंग्रजी शाळांकडे आहे. परिणामी मनपाच्या शाळांमधील पटसंख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. स्पर्धेत टिकण्यासाठी व मनपाच्या शाळांमधूनही गरीब विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळत राहावे यासाठी मराठी, हिंदी व उर्दूप्रमाणेच इंग्रजी माध्यमांच्या शाळा सुरू करण्याची गरज बैठकीत व्यक्त करण्यात आली. त्यानुसार शहरातील सहा विधानसभा मतदार क्षेत्रामध्ये प्रत्येकी एक शाळा सुरू करण्यात येणार आहे. यासाठी मनपाने जागा शोधून ठेवल्या असल्याचे शिक्षणाधिकाºयांनी सांगितले. या शाळांसाठी ‘द आकांक्षा फाउंडेशन’चे तांत्रिक व आर्थिक सहकार्य लाभणार आहे. आकांक्षा फांउडेशन शालेय शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाºयांच्या वेतन खर्चाच्या प्रथम वर्षी ३० टक्के, दुसºया वर्षी ३५ टक्के, तिसºया वर्षी ४० टक्के, चौथ्या वर्षापासून पुढे सामंजस्य करार ४५ टक्के खर्च करणार आहे, उर्वरित खर्च मनपा करेल. पायाभूत सुविधा, विद्युत, पाणी, शाळा इमारत निर्माण व देखभाल दुरुस्ती, गणवेश, पाठ्यपुस्तके, शालेय पोषण आहार, गणवेश पुरक बाबी, शालेय सुरक्षा, स्वच्छता विषयक बाबींसह इतर खर्च मनपा करणार आहे, असेही शिक्षणाधिकारी प्रीती मिश्रीकोटकर यांनी सांगितले.

विधानसभानिहाय इंग्रजी माध्यम शाळा
उत्तर नागपूरमध्ये राणी दुर्गावती प्राथमिक शाळा, पूर्व नागपूरमध्ये बाभुळबन मराठी प्राथमिक शाळा, दक्षिण-पश्चिम नागपूरमध्ये स्व. बाबुरावजी बोबडे मराठी प्राथमिक शाळा, पश्चिम नागपुरात रामनगर मराठी मराठी प्राथमिक शाळा, दक्षिण नागपूरमध्ये रामभाऊ म्हाळगीनगर मराठी प्राथमिक शाळा आणि मध्य नागपूरमध्ये स्व. गोपालराव मोटघरे (खदान) हिंदी उच्च प्राथमिक शाळा या शाळांमध्ये इंग्रजी माध्यमांचे वर्ग सुरू केले जाणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *