नागपूर : महानगरपालिका मुख्यालयातील इमारतीच्या दालनातआज हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठया उत्साहाने साजरी करण्यात आली.
महापौर दयाशंकर तिवारी, उपमहापौर मनीषा धावडे, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी., अतिरिक्त आयुक्त राम जोशी, संजय निपाणे, उपायुक्त निर्भय जैन, रविन्द्र भेलावे, उद्यान निरीक्षक अनंता नागमोते, अशोक कुमार शुक्ला, ब्रिजभूषण शुक्ला यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या तैलचित्राला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. महापौरांनी महापौर कक्षात आणि सत्तापक्ष कार्यालयातही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला देखील माल्यार्पण केले.
महापौर म्हणाले, की छत्रपती शिवरायांचे आदर्श राज्याची संकल्पना त्यांना आईकडून प्राप्त झालेले संस्कार आणि राज्य चालविण्याची नीतिमत्ता, सर्व समुदायांच्या लोकांना एकत्रित करून चालण्याच्या कृतीबद्दल मनपा शाळेच्या विद्यार्थ्यांना माहिती दिली जाईल. माझे सौभाग्य आहे की महापौर म्हणून मला ‘जाणता राजां’ ची जयंती साजरी करण्याची संधी मिळाली.
छत्रपती शिवाजी महाराज रयतेचे राजा होते. आधुनिक विज्ञान शिवरायाच्या राज्य योजनेचा एक भाग होता. पर्यावरण संवर्धन, जल संवर्धन, वृक्ष संवर्धनचा त्यांच्या राज्य योजनेत सहभाग होता. शिवाजी महाराजांनी समाजातील खालच्या वर्गांना सोबत घेऊन एक मोठी फौज तयार केली. त्यांनी मूठभर मावळे घेवून हिंदवी स्वराज्याचे संस्थापनेसाठी पाऊल उचलले. त्यांचे शासन आदर्श शासन म्हणून ओळखले जाते, असेही ते म्हणाले.
महाल गांधीगेट जवळील शिवाजी महाराजांच्या पुतळयाला माल्यार्पण
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त महापौर तिवारी व उपमहापौर धावडे यांनी सकाळी महाल गांधीगेट स्थित छपपतींच्या पूणार्कृती पुतळयाला नगरीच्या वतीने पुष्पहार अर्पण केले.
याप्रसंगी माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, परिवहन समिती सभापती नरेन्द्र (बाल्या) बोरकर, गांधीबाग झोनच्या नवनिर्वाचित सभापती श्रद्धा पाठक, नगरसेविका सरला नायक, माजी स्थायी समिती अध्यक्ष बंडू राऊत, माजी नगरसेवक भास्कर पराते, रामभाऊ आंबुलकर, अशोक नायक, हंबिरराव मोहिते आदी उपस्थित होते.