Home प्रादेशिक विदर्भ अमरावती, अचलपूर शहर प्रतिबंधित क्षेत्र घोषित

अमरावती, अचलपूर शहर प्रतिबंधित क्षेत्र घोषित

54

अमरावती : जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याने लॉकडाऊन करणे अत्यावश्यक झाले आहे. संक्रमितांची संख्यावाढ रोखण्यासाठी अमरावती महापालिका क्षेत्र व अचलपूर नगरपालिका क्षेत्र प्रतिबंधित क्षेत्र करण्यात येत असून, 22 फेब्रुवारीच्या रात्री आठपासून 1 मार्चच्या सकाळी सहापर्यंत तिथे संचारबंदी लागू असेल. वैद्यकीय व जीवनावश्यक सेवांना यातून सूट दिली आहे. कोरोना साथीवर मात करण्यासाठी हा निर्णय घ्यावा लागत आहे. नागरिकांनी दक्षता त्रिसूत्रीचा अवलंब करून कोरोनावर मात करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी आज येथे केले.

जिल्ह्यातील कोरोना स्थिती लक्षात घेऊन पालकमंत्र्यांनी आज दुपारी जिल्हाधिकारी संबंधित सर्व विभागांची बैठक घेऊन विविध निर्देश दिले. महापौर चेतन गावंडे, विभागीय आयुक्त पियूष सिंह, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, पोलीस आयुक्त आरती सिंह, पोलीस अधीक्षक हरी बालाजी, मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, महापालिका आयुक्त प्रशांत रोडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, जिल्हा आरोग्य अधिकारी दिलीप रणमले, महापालिकेकडून बबलू शेखावत, विलास इंगोले, हरिभाऊ मोहोड आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.

पालकमंत्री ठाकूर [ YASHOMATI THAKOOR ] म्हणाल्या की, बाधितांची संख्या वाढत असल्याने लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही. गत सप्टेंबरमध्ये सर्वाधिक केसेस होत्या, त्यापेक्षाही केसेस आता आहेत. त्यामुळे केवळ जीवनावश्यक वस्तू सोडल्या तर बाकी सर्व सेवा बंद राहतील. या काळात सर्व नागरिकांनी स्वत:ची व इतरांचीही काळजी घ्यावी. मास्क वापरणे, हातांची स्वच्छता व सुरक्षित अंतर या त्रिसूत्रीचा अवलंब करावा. हे पालन न केल्यास आणखी रुग्णांची संख्या वाढून लॉकडाऊनचा कालावधी पुन्हा वाढविण्याचा निर्णय नाईलाजाने घ्यावा लागेल. त्यामुळे नागरिकांनी नियम पाळून सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.

महापालिका, पोलीस, वाहतूक शाखा यांनी संयुक्त मोहिम राबवून नियमभंग करणाऱ्यांवर कडक कारवाई व्हावी. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणाऱ्या सेवा सुरू राहतील, पण तिथेही गर्दी टाळण्यासाठी वेळेची मर्यादा राहील. संचारबंदीचा भंग करणाऱ्यांवर वेळीच कारवाई व्हावी, असेही निर्देश त्यांनी दिले. अमरावतीत 1600 खाटांची उपलब्धता आहे. खासगी रुग्णालयांतील खाटांचे प्रमाण वाढविण्यासाठी प्रयत्न होत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here