आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या खात्यात लाभाची रक्कम जमा

उतर महाराष्ट्र

नाशिक : आदिवासी वसतिगृहात प्रवेशित विद्यार्थ्यांना आदिवासी विकास विभागामार्फत आहार, निर्वाह आणि साधनसामुग्रीच्या अनुषंगाने दरवर्षी निर्धारीत रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यात थेट लाभ हस्तांतरीत केली जाते. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 2020-21 शैक्षणिक वर्ष उशिरा सुरु झाल्याने थेट लाभ हस्तांतरणाची प्रलंबित असलेली रक्कम सद्यस्थितीत महाविद्यालयीन वर्ग सुरु झाल्याने विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे, अशी माहिती आदिवासी विकास विभागाचे [ trible department ] आयुक्त हिरालाल सोनवणे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

शासकीय प्रसिद्धी पत्रकात नमूद केल्यानुसार, आदिवासी वसतिगृहातील प्रवेशित विद्यार्थ्यांना दरवर्षी आहार, साधनसामुग्री आणि निर्वाह निर्धारित रक्कम ही डीबीटीद्वारे दिली जाते. जून ते ऑगस्ट या कालावधीत पहिला हप्ता, सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीसाठी दुसरा हप्ता, डिसेंबर ते फेब्रुवारी कालावधीमध्ये तिसरा हप्ता आणि मार्च ते मे कालावधीत चौथा हप्ता अशा स्वरुपात रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यावर अदा करण्यात येत असते. 2020-21 या शैक्षणिक वर्षामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने शाळा आणि महाविद्यालये नियमित सुरु नव्हती. परंतु इयत्ता 9 वी ते 12 वी पर्यंतचे वर्ग 23 नोव्हेंबर 2020 पासून आणि इयत्ता 5 वी ते 8 वीचे वर्ग फेब्रुवारी 2021 पासून शासनाच्या परवानगीनुसार सुरु करण्यात आले आहेत. या अनुषंगाने आदिवासी वसतिगृहाच्या प्रवेशित विद्यार्थ्यांना तिसऱ्या हप्त्यातील आहार आणि निर्वाह भत्ता तसेच वार्षिक साधनसामुग्री रक्कम त्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित करण्यात आली असल्याचे कळविण्यात आले आहे.

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इयत्ता आठवीपासून पुढे माध्यमिक व उच्च माध्यमिक पदवी व पदव्युत्तर व्यावसायिक अभ्यासक्रमाचे शिक्षण घेता यावे, या हेतूने आदिवासी विभागाद्वारे 1982 पासून शासकीय वसतिगृहे योजना कार्यरत आहे. सध्या राज्यभरात एकूण 487 वसतिगृहे कार्यरत असून यामध्ये अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रवेशित शाळा अथवा महाविद्यालयानुसार विभाग व जिल्हा स्तरावर आदिवासी वसतिगृहात प्रवेश दिला जातो. 487 वसतिगृहांपैकी 120 वसतिगृहांमध्ये आहार डीबीटी दिली जाते. तर उर्वरित तालुका व ग्रामीण स्तरावरील वसतिगृहांमध्ये भोजन पुरविले जाते.

सर्व 487 वसतिगृहामध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता आणि साधनसामुग्रीच्या अनुषंगाने आहार भत्त्यासाठी विभागस्तरावर प्रत्येक विद्यार्थ्यांला प्रति महिना तीन हजार 500 रूपये, जिल्हास्तरावर तीन हजार रूपये आणि तालुका व ग्रामीणस्तरावर भोजन पुरवठा करण्यात येतो. त्याचप्रमाणे निर्वाह भत्त्यासाठी विभागस्तरावर प्रत्येक विद्यार्थ्यांला प्रति महिना 800 रूपये, जिल्हास्तरावर 600 रूपये आणि तालुका व ग्रामीणस्तरावर 500 रूपये देण्यात येतात. तसेच मुलींना स्वच्छता व प्रसाधनासाठी अतिरिक्त प्रतिमाह 100 रूपये दिले जातात.

त्याचप्रमाणे साधनसामुग्री भत्त्यासाठी इयत्ता 8 वी ते 10 वीच्या प्रत्येक विद्यार्थ्यांला प्रति वर्षाला तीन हजार 200 रूपये, इयत्ता 11 वी ते 12 वीच्या प्रत्येक विद्यार्थ्यांला प्रति वर्षाला चार हजार रूपये, इयत्ता 12 वी व त्यापुढील शिक्षणासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांला प्रति वर्षाला चार हजार 500 रूपये तर वैद्यकीय अभियांत्रिकी पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांला प्रति वर्षाला सहा हजार रूपयांची रक्कम आयुक्तालय स्तरावरून विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा केली जात असते, असे कळविण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *