Home उपराजधानी नागपूर नागपुरात बाजारपेठा, दुकाने दर शनिवारी व रविवारी पुढील आदेशापर्यंत राहणार बंद

नागपुरात बाजारपेठा, दुकाने दर शनिवारी व रविवारी पुढील आदेशापर्यंत राहणार बंद

54

नागपूर : कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता सुरक्षेच्या दृष्टीने नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी मनपा हद्दीतील सर्व बाजारपेठा व सर्व प्रकारची दुकाने दर शनिवारी व रविवारी पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचे आदेश मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी दिले आहेत.

यात रेस्टॉरंट, हॉटेल आणि खाद्यगृहांचा देखील समावेश करण्यात आला आहे. मात्र आॅनलाईन फुड डिलिव्हरीला परवानगी देण्यात आली आहे. यासाठी रेस्टॉरंट, हॉटेल आणि खाद्यगृहांचे किचन सुरू असणार आहेत. यासोबतच मनपा हद्दीतील राज्यस्तरीय / राष्ट्रीय / आंतरराष्ट्रीयस्तरावरील खेळाडूंना परवानगी दिलेले तरणतलाव तसेच सर्व वाचनालय, अध्ययन कक्ष ७ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी दिले आहेत. आठवडी बाजारातील सर्व प्रकारचे दुकाने बंद राहतील.

सोमवारी (ता. २२) मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी मनपा हद्दीतील शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस, प्रशिक्षण संस्था यासह शहरातील सर्व आठवडी बाजार ७ मार्च २०२१ पर्यंत बंद ठेवणे तसेच शहर सीमेमध्ये धार्मिक, राजकीय सभा, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांवरही प्रतिबंध लावण्याचे आदेश दिले होते. त्यामध्ये अंशत: सुधारणा करून उपरोक्त आदेश जारी केले आहेत.
शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस, प्रशिक्षण संस्था बंद असल्या तरी त्यांना आॅनलाईन स्वरूपात शिक्षण व प्रशिक्षण सुरू ठेवता येणार आहे. शहर सीमेमध्ये धार्मिक, राजकीय सभांसह सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांवर प्रतिबंध घालण्यात आल्याने सदर कार्यक्रमांना व सभांना मनपा प्रशासनाने पूर्वपरवानगी दिली असल्यास ती रद्द समजण्यात यावी, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here