मुंबई : राज्याची आर्थिक घडी विस्कटली असून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्नही बिकट झाला असल्याची टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस [devendra fadanvees] यांनी केली आहे.
विधिमंडळ अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर रविारी भाजपा विधिमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. अवैध वाळूची चोरी, पोलिसांच्या बदल्यांमध्ये आणि कोविड परिस्थितीत मोठा भ्रष्टाचार झाला आहे, त्याचे पुरावे आमच्याकडे आहेत, त्या भ्रष्टाचाराची पुस्तिका आम्ही मांडणार आहोत, असेही फडणवीस म्हणाले.
महिलांवर अत्याचार वाढले आहेत, इतके ढळढळीत पुरावे असतानाही संजय राठोड यांच्यावर पोलिस कारवाई करत नसतील तर वरिष्ठांचा आशिर्वाद असल्याशिवाय हे शक्य नाही, असा आरोप त्यांनी केला. शक्ती कायदा हा एक फार्स आहे. जर मंत्री राठोड राजीनामा देत नसतील तर या कायद्याच्या समितीत असलेले आम्ही भाजपाचे सर्व सदस्य राजीनामे देतोय, असे त्यांनी स्पष्ट केले.