Home मुंबई घोषणांचा पाऊस आणि अंमलबजावणीचा दुष्काळ, असे होऊ देणार नाही, मुख्यमंत्र्यांचा निर्धार

घोषणांचा पाऊस आणि अंमलबजावणीचा दुष्काळ, असे होऊ देणार नाही, मुख्यमंत्र्यांचा निर्धार

44

मुंबई : जगाचे कामाचे तास सूर्यप्रकाशात असतात आणि शेतकºयांचे मात्र रात्रीचे कशासाठी. ऊन्ह, वारा, पाऊस अशा सर्व संकटांचा मुकाबला करत तो जगासाठी सोनं पिकवत असतो. त्याच्या आयुष्यात सुखा- समाधानाचे क्षण कसे येतील हे पाहणे सरकारचे काम आहे. घोषणांचा पाऊस आणि अंमलबजावणीचा दुष्काळ, असे आम्ही होऊ देणार नाही. त्यांच्या आशीर्वादाची ताकद मोठी असते. ती जेवढी जास्त मिळेल तेवढा काम करण्याचा हुरुप वाढतो. त्या जोरावर आम्ही शेतकºयांसाठी जे जे करणे शक्य आहे ते निश्चितच करू, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिली.

महाकृषी ऊर्जा अभियानांतर्गत कृषी ऊर्जा पर्वाचा शुभारंभ मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या हस्ते विधानभवनात करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, महाऊर्जाचे महासंचालक सुभाष डुंबरे, महावितरणच्या औरंगाबाद प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. नरेश गिते आदी उपस्थित होते.

शेतकरी बांधवांना दिवसा आणि पुरेशी वीज देणे शासनाची प्राथमिकता असून महाकृषी ऊर्जा अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. त्यांचे प्रश्न सोडविण्यास आमचे प्राधान्य असून नुकतेच नीती आयोगासोबत झालेल्या दृकश्राव्य बैठकीत पीक विम्याचा प्रश्न उपस्थित केला असल्याचेही श्री. ठाकरे यांनी सांगितले.

सर्व देश, राज्य टाळेबंदीत (लॉकडाऊन) होते तरी शेतकरी बांधव मात्र कर्तव्यावर होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बहुतांश कार्यालयीन कामे घरूनच (वर्क फ्रॉम होम) केली जात होती. शेतकºयांनी लॉकडाऊन केले असते तर कठीण परिस्थिती निर्माण झाली असती. इतरांसाठी मळे फुलवणाºयांच्या आयुष्यात काटे येऊ नयेत यासाठी त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या मागे सरकार ठामपणे उभे राहील, अशी ग्वाहीदेखील मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी दिली.

थकबाकी भरून लाभ घ्या : उपमुख्यमंत्री

उपमुख्यमंत्री अजित पवार [ ajit pawar ] म्हणाले, वीजग्राहकांमध्ये आपलेपणाची भावना निर्माण करण्यासाठी शासनाने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. वीजबिल थकलेल्या सर्व शेतकºयांनी थकित वीजबिलांवर सूट मिळवण्यासाठी नवीन कृषी वीज जोडणी धोरणाअंतर्गत जाहीर केलेल्या योजनेचा लाभ घ्यावा. तसेच, शेतकरी, घरगुती वीज ग्राहक आदी सर्वांनाच व्यवस्थित वीज मिळाली पाहिजे यासाठी सर्वांनी वीजबिले भरणे आवश्यक आहे. वीजगळती होणार नाही याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे.
आम्ही शेतकºयांचे प्रतिनिधी असून त्यांचे प्रश्न, कृषिपंपांचे महत्त्व आम्हाला माहीत आहे. सर्वांना व्यवस्थित वीज मिळेल. वेळेत विजेची जोडणी मिळेल हे आमचे उद्दिष्ट आहे. 5 वर्षात 5 लाख सौर कृषिपंप देण्याचे शासनाचे उद्दिष्ट आहे. दिवसा वीज देण्याच्या अनुषंगाने सौर कृषिपंप योजनेला प्रोत्साहन देण्याचे शासनाचे धोरण असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here