Home अनुपमा... महिला विश्व पंच्याऐंशी वर्षीय आजीचे कोविड लसीकरणासाठी आवाहन

पंच्याऐंशी वर्षीय आजीचे कोविड लसीकरणासाठी आवाहन

96

नागपूर : राज्यात आरोग्य विभाग व कोविड योध्दांबरोबरच 60 वर्ष वयोगटावरील ज्येष्ठ नागरिकांना कोविड लसीकरण करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. नागपूर जिल्ह्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला मोठया प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. नागपूर शहरात ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या कुटूंबियांसोबत लसीकरणाला प्रतिसाद दिला आहे. याचा एक भाग म्हणून महापालिकेच्या इंदिरा गांधी रुग्णालयात ज्येष्ठ नागरिकांसाठी लसीकरण मोहीम सुरु करण्यात आली आहे.

रुग्णालयात ज्येष्ठ नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या. प्रत्येकांनी आरोग्याच्या दृष्टीने लस टोचून घेतली. यामध्ये 85 वर्षाच्या आजीबाई रेखा देशपांडे यांचा समावेश असून त्यांनी कोणतीही भिती मनात न बाळगता लस घेतली. सर्वांनी कोविड-19 लसीकरण मोहिमेत सहभागी होऊन लस टोचून घ्यावी, असे त्या म्हणाल्या. आरोग्यदायी जीवनासाठी ही लस घ्या, असे कळकळीचे आवाहन त्यांनी केले.

लसीकरणासाठी केंद्रावर कोविन ॲपवर नोंदणी करण्यात येते. जिल्हयात झालेल्या लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात पहिल्याच दिवशी 60 वर्षावरील 657 ज्येष्ठ नागरिकांना लस देण्यात आली आहे. जिल्हयातील नागरिकांनी कोविड लसीकरण मोहिमेत सहभागी होऊन जास्तीत जास्त लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी केले. भगवानदास राठी, विठ्ठल मुंदडा, विमल तिवारी व सौ. अर्चना तिवारी, मदन श्यामराव बुध्दे व सौ. हेमलता बुध्दे यांनी सुध्दा लस घेऊन आनंदाने सेल्फी दिली. लसीकरणासाठी ज्येष्ठ नागरिकांची मोठया प्रमाणात उपस्थिती होती.