Home अनुपमा... महिला विश्व गावाला साक्षर करून पूर्ण करण्याचा सुनिता पावरा यांचा निर्धार

गावाला साक्षर करून पूर्ण करण्याचा सुनिता पावरा यांचा निर्धार

83

स्वप्न पाहण्यातच आयुष्य घालविणारे किंवा ते पूर्ण न झाल्याच्या वेदना घेऊन जगणाऱ्यांकडून चांगले काम होऊ शकत नाही. उलट स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी धडपड करणारे आपल्या कामातून समाधान मिळवु शकतात हे रेवानगरच्या सुनिता पावरा यांनी सिद्ध केले आहे. शिक्षिका होण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नसले तरी गावातील मुलांना चांगले शिक्षण देण्यासाठी सतत नवे उपक्रम राबविण्याचा प्रयत्न त्या करीत आहेत.

धडगावच्या असलेल्या सुनिताताईंनी लग्नानंतर अंगणवाडी सेविका म्हणून काम करण्यास सुरूवात केली. शिक्षण केवळ १२ वी पर्यंत झाल्याने त्यांना इच्छा असूनही शिक्षिका होता आले नाही. बालकांना शिकविण्याचे समाधान मिळावे म्हणून त्यांनी अंगणवाडी सेविकेचे काम स्वीकारले. अंगणवाडीची इमारत सुंदर असावी अशी त्यांची इच्छा होती. ग्रामपंचायतीकडून मिळणारा निधी पुरेसा नसल्याने त्यांनी लोकसहभागातून इमारतीला सजविले. आतादेखील प्रवेशद्वारासाठी त्यांनी ५ हजार रुपये गोळा केले असून २५ हजाराचा निधी उभारण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

बालकांचे पूर्णशिक्षण चांगले झाल्यास पाया मजबूत होत असल्याने त्यांनी अंगणवाडीतच नवे शैक्षणिक उपक्रम राबविले. टाकाऊ वस्तूपासून शैक्षणिक साहित्य तयार करून खेळणी, मॉडेल्स, खेळ, चित्रे, विविध वस्तूंच्या सहाय्याने मुलांना इथे शिक्षण दिले जाते. त्यामुळे अंगणवाडीत येणारी मुले उत्साहाने वावरताना आणि चटकन प्रतिसाद देताना दिसतात. नव्या वस्तू तयार केल्यानंतर मुलांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद उत्साह देणारा असल्याचे त्या सांगतात.

गावातील कुपोषण दूर करण्यातही त्यांना चांगले यश आले आहे. 19 कुपोषित बालकांच्या प्रकृतीत सुधारणा घडवून आणण्यासाठी त्यांनी विविध उपक्रम राबविले. खाजगी डॉक्टरांकडून उपचाराचा आग्रह धरून एका कमी वजनाच्या मुलीचे प्राणही वाचविले. महिलांना पाककृती करून दाखविणे, आहाराची माहिती देणे, घरातील पाककृती अंगणवाडीत आणण्यासाठी सांगणे व त्यात सुधारणा सुचविणे आदी उपक्रम कुपोषण कमी करण्यात उपयुक्त ठरले आहेत.

डिजिटल अंगणवाडीच्या माध्यमातून त्यांनी सहज शिक्षणाची पद्धत अनुसरली आहे. त्यामुळे बाळगोपाळ अंगणवाडीत रमतात आणि आनंदी दिसतात. शिक्षण आणि व्यायाम यांचा समन्वय होण्यासाठी त्यांनी स्वत:च्या पद्धती विकसित केल्या आहेत. त्यामुळेच लहान मुलांसोबत वाघोबाचे गाणे म्हणताना आणि लहान मुल होऊन नाचताना आपल्या कामात रममाण होताना दिसतात.

आपली अंगणवाडी सुंदर करण्यासोबत परसात भाजीपाला लावण्याची त्यांची इच्छा आहे. बालकांना निसर्गात रममाण होता यावे आणि पौष्टिक अन्न मिळावे यासाठी त्यांचे प्रयत्न आहेत. आदर्श शिक्षिका होण्यासाठी शाळेतील नोकरीच असावी लागते असे नाही तर शिकणारा आणि शिकविणाऱ्यात विश्वासाचे-स्नेहाचे नाते निर्माण होणे गरजेचे असते. सुनिताताईंच्या अंगणवाडीत हेच पहायला मिळत असल्याने तेथील मुले नक्कीच पुढे चांगले शिक्षण घेतील.

(सौजन्य : जिल्हा माहिती कार्यालय, नंदुरबार)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here