Home राजधानी मुंबई नंदा खरे यांना साहित्य अकादमी पुरस्कार; आबा महाजन यांना बाल साहित्य पुरस्कार

नंदा खरे यांना साहित्य अकादमी पुरस्कार; आबा महाजन यांना बाल साहित्य पुरस्कार

74

नवी दिल्ली : प्रसिद्ध लेखक नंदा खरे यांच्या ‘उद्या’ या कांदबरीस वर्ष 2020 साठीचा सर्वोत्कृष्ट मराठी कलाकृतीचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला. तसेच, प्रसिद्ध बाल साहित्यिक आबा महाजन लिखित आबाची गोष्ट या लघुकथा संग्रहास बाल साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे.

साहित्य अकादमीचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर कंबार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत देशातील २० भाषांकरिता साहित्य अकादमी पुरस्कार तसेच २१ लेखकांना बाल साहित्य पुरस्कार तर १८ भाषांकरिता युवा पुरस्कार विजेत्यांची घोषणा करण्यात आली.

साहित्य अकादमीने २० प्रादेशिक भाषांतील सात कविता संग्रह, चार कादंबऱ्या, पाच कथासंग्रह , दोन नाटके, एक संस्मरण आणि एक महाकाव्य या सर्वोत्कृष्ट कलाकृतींना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर केला. यात मराठी भाषेसाठी प्रसिद्ध लेखक नंदा खरे यांच्या उद्या कादंबरीस हा मानाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे स्वरूप 1 लाख रूपये, ताम्रपत्र आणि शाल असे असून यावर्षी विशेष समारंभात पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. मराठी साहित्यातील पुस्तक निवड समितीमध्ये प्रसिद्ध साहित्यिक वसंत आबाजी डहाके, सतीश काळसेकर आणि डॉ. निशिकांत मिराजकर यांचा समावेश होता. मल्याळम, नेपाळी , उडिया आणि राजस्थानी भाषेसाठीचे पुरस्कार येत्या काळात घोषित करण्यात येणार आहेत.

मराठी भाषेसाठी युवा पुरस्काराची लवकरच घोषणा

साहित्य अकादमीच्या वर्ष २०२० च्या युवा पुरस्कारांचीही घोषणा करण्यात आली. एकूण १८ प्रादेशिक भाषांतील युवा लेखकांना हे पुरस्कार जाहीर झाले. येत्या काळात मराठीसह गुजराती, सिंधी, बंगाली, राजस्थानी आणि मल्याळम या भाषांसाठी युवा पुरस्कारांची घोषणा करण्यात येणार असल्याचे साहित्य अकादमीच्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.