Home राजधानी मुंबई अंधश्रद्धा निर्मूलन कायदा २०१३ ची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश

अंधश्रद्धा निर्मूलन कायदा २०१३ ची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश

32

मुंबई : उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठ येथे अंधश्रद्धा निर्मूलन कायदा, 2013 च्या संदर्भात दाखल केलेल्या याचिकेसंदर्भात (क्रिमिनल याचिका क्र.469/2015) 5 जानेवारी 2021 अन्वये आदेश निर्गमित केले आहेत. यासंदर्भात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे प्रधान सचिव श्याम तागडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.

यावेळी गृह विभागाचे उपसचिव संजय खेडेकर, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक (वृत्त व जनसंपर्क) गणेश रामदासी, तसेच सामाजिक न्याय व गृह विभागाचे अधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम, 2013 लागू आहे.

कोणत्याही व्यक्तीने स्वत: किंवा इतर कोणत्याही व्यक्तीमार्फत नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा अशा स्वरुपाची कोणतीही कृती केली असेल आणि या अधिनियमाच्या तरतुदींचे उल्लंघन करुन नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा याची जाहिरात, आचरण, प्रचार किंवा प्रचालन केले तर तो या अधिनियमाच्या तरतुदीखाली अपराध ठरेल आणि अशा अपराधासाठी दोषी असलेली व्यक्ती, दोष सिद्ध झाल्यानंतर शिक्षेस पात्र असेल अशी तरतूद यामध्ये आहे. या कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी व जनजागृती करण्याचे निर्देश देण्यात आले. या अधिनियमाची अंमलबजावणी सर्व संबंधित विभाग व यंत्रणांनी प्रभावीपणे करावी, असे निर्देशही देण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here