बालके भविष्याच्या समाजपरिवर्तनाचे शिलेदार : डॉ.नीलम गोऱ्‍हे

राजधानी मुंबई

मुंबई : समाजात महिला-बालके-पुरूष यामध्ये विविधस्तरावर समानता प्रस्थापित व्हावी यासाठी अनेक संस्था कार्यरत आहेत. मात्र समाजाच्या प्रगतीसाठी सर्वांनी एकत्र येऊन एक खिडकी योजनेप्रमाणे काम करणे गरजेचे आहे. बालकांप्रती असलेली समाजाची मानसिकता बदलण्यासाठी उपाययोजना आखणे गरजेचे आहे. आजची बालके उद्याच्या समाज परिवर्तनाचे शिलेदार असल्याचे मत विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्‍हे [ dr neelam gorhe ] यांनी व्यक्त केले.

बालकांच्या आणि महिलांच्या सशक्तीकरणासाठी कार्यरत कोरो या संस्थेने राज्यातील तीन जिल्ह्यातील ५० गावांत बालकांच्या संरक्षणार्थ काम करून, यासंदर्भात मुलांच्या मदतीने सर्वेक्षण आणि संशोधन करून दृकश्राव्य पद्धतीने अहवाल सादरीकरण केले.

उपसभापती डॉ. गोऱ्‍हे म्हणाल्या, राज्य शासनाने प्रत्येक जिल्ह्यात नाविन्यपूर्ण कार्य आणि संशोधनासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. त्याद्वारे महिला व बालकांचे सक्षमीकरण आणि समाजाच्या मानसिकतेत बदल करण्यासाठीच्या कार्यास मदत होऊ शकते. पर्यावरण मंत्री यांच्या मार्गदर्शनाअंतर्गत शाश्वत विकासासंदर्भात युनोने दिलेली उद्दीष्ट पूर्ण करण्याचे काम सुरू आहे. कोरो सारख्या अशासकिय संस्था जे कार्य करीत आहेत ते उपयुक्त असून, बालकांमार्फत अशा पद्धतीने सर्वेक्षण करून संशोधनात त्यांचा सहभाग करून घेणे हे अभिनंदनीय आहे. या शाश्वत विकासासंदर्भात केवळ चर्चा करून थांबणे योग्य नसून संबंधित उपाययोजना ह्या कृतीद्वारे मुख्य प्रक्रियेत आणणे महत्त्वाचे आहे. ग्रामसभेशी संवाद साधून मदत मिळविणे आणि बालसभा घेण्याची मागणी करणे हे या बालकांनी स्वतः केले आहे. हे विकासाच्या दृष्टीने पडलेले सकारात्मक पाऊल असल्याचे डॉ. गोऱ्‍हे यांनी सांगितले. महिला आणि मुलांच्या सक्षमीकरणासाठी विविध व्यासपीठावरून संस्थांनी काम करताना एकत्र येऊन चर्चा करून उपाययोजना व अंमलबजावणी करणे महत्त्वाचे असल्याचे उपसभापती डॉ. गोऱ्‍हे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *