Home राष्ट्रीय आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीत मतदान सुरू

आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीत मतदान सुरू

56

नवी दिल्ली : पश्चिम बंगाल आणि आसाममधल्या विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी आज सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली.

आसाममध्ये या टप्प्यात 12 जिल्ह्यांतल्या 47 मतदारसंघांचा समावेश आहे. 23 महिलांसह 264 उमेदवार रिंगणात असून, 81 लाखांहून अधिक मतदार या उमेदवारांचे राजकीय भवितव्य ठरवणार आहेत.

राज्यात भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी, कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील महाआघाडी आणि आसाम जातीया पार्टी आणि रायजोर दल यांची आघाडी, अशा तीन प्रमुख राजकीय आघाड्या आहेत.

पहिल्या टप्प्यात मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष रीपुन बोरा, आसाम गण परिषदेचे अध्यक्ष अतुल बोरा आणि रायजोर दलाचे अध्यक्ष अखिल गोगोई आदी प्रमुख नेते रिंगणात आहेत. आसाममध्ये संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदान चालणार आहे.

पश्चिम बंगालमध्ये सकाळी 7 वाजता सुरू झालेले मतदान संध्याकाळी साडेसहा वाजेपर्यत सुरू असेल. पहिल्या टप्प्यात राज्यात 30 जागांसाठी 191 उमेदवार निवडणूक लढवत असून त्यापैकी 31 महिला आहेत.

74 लाख मतदार या उमेदवारांचे राजकीय भवितव्य ठरवतील. राज्यात तृणमूल कॉंग्रेस, भाजप, डावे पक्ष आणि कॉंग्रेस हे प्रमुख पक्ष आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर ईलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राबरोबरच, व्हीव्हीपॅट यंत्राचीही व्यवस्था निवडणूक आयोगानं केली आहे.

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक मतदान केंद्रावर दीड हजार ऐवजी एक हजार मतदारांनाच परवानगी देण्यात आली आहे. संसर्गग्रस्त किंवा विलगीकरणात असलेले, वयाची 80 वर्षे ओलांडलेले आणि दिव्यांग व्यक्तींना टपालाद्वारे मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.