राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडून जनतेला होळी,रंगपंचमीनिमित्त शुभेच्छा

राजधानी मुंबई

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यातील जनतेला होळी तसेच धुलीवंदनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. समाजातील कटुता व द्वेषभावना दूर सारून स्नेह व सुसंवादाच्या रंगात रंगण्याचा हा सण आहे. यंदा कोरोनाचे सावट कायम असल्याने सर्वांनी आपल्या घरीच हा सण साजरा करावा व पर्यावरणाचे रक्षण करावे, असे आवाहन करतो व सर्वांना या पवित्र सणानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो, असे राज्यपाल कोश्यारी यांनी संदेशात म्हटले आहे.

सण साधेपणाने साजरे करावेत : मुख्यमंत्री 

परस्परांची आणि पर्यावरणाची काळजी घेत, येणारे होळी, धुलिवंदन आणि रंगपंचमी हे सण साधेपणाने साजरे करावेत. सण-उत्सवाचा आनंद हा परस्परांविषयी, निसर्गाविषयी आदर वाढवण्यासाठी असतो. या सणांकडून प्रेरणा घेऊन कोरोना विषाणूला रोखण्याच्या नियमांचे काटेकोर पालन करूया, असे आवाहन करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला होळी, धुळवडीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

कोरोना विषाणूचा संसर्ग वाढतो आहे. त्यासाठी रविवार (दि.28) पासून दि. 15एप्रिल 2021 पर्यंत रात्रीच्या ( रात्री 8 ते सकाळी 7 वा. पर्यंत) वेळी जमावबंदी लागू केली आहे. या वेळेत उद्याने, चौपाट्या अशा सार्वजनिक ठिकाणीही एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. कोरोनाला रोखण्यासाठी गर्दी टाळणे, मास्क वापरणे, हात धुणे या त्रिसुत्रीचे पालन अत्यावश्यक आहे.  गृह विभागानेही हे सण साधेपणाने साजरे करावेत. नियमांचे पालन न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचेही आदेश काढण्यात आले आहेत. या सगळ्या गोष्टींची दखल घेऊन सण-उत्सव साजरे करावेत. होळी, धूलिंवदन सण यातून वाईट गोष्टींना हद्दपार करण्याची प्रेरणा घेऊया. निसर्गही रंगाची उधळण करतो. आपल्या आयुष्यातही रंग भरतो. रंग आनंद, सुख-समृद्धी घेऊन येतात. त्यामुळे रंगाचा सण साजरा करतानाही आपल्याला परस्परांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. गर्दी नकोच. एकत्र येणे टाळून कोरोनाचा संसर्ग आणि प्रादुर्भाव रोखणे या देखील परस्परांसाठी शुभेच्छा आहेत. सदिच्छा आहेत, असे मानून सण साजरे करावेत. धार्मिक व सांस्कृतिक परंपरा देखील अशाच पद्धतीने नियम पाळून व्हाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त करून मुख्यमंत्र्यांनी या सणांच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.

सण सुरक्षित वातावरणात साजरा करावा : उपमुख्यमंत्री

 उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला होळी आणि धूलिवंदन सणाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर साजरा होत असलेला होळीचा सण सर्वांनी कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करून सुरक्षित वातावरणात साजरा करावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. होळी आणि धूलिवंदनाचा सण पारंपरिक पद्धतीने आणि उत्साहात साजरा करण्याची आपली प्रथा आहे. परंतु यंदा उत्सव साजरा करण्यावर मर्यादा आहेत. कोरोना संकटामुळे घालून दिलेल्या मर्यादांचे पालन करूनच यंदा होळीचा सण साजरा व्हावा. होळी साजरी करताना निसर्गाचे आणि पर्यावरणाचे रक्षण होईल, याची काळजी घ्यावी, असे आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केले आहे. मास्क लावणे, सुरक्षित अंतर ठेवणे आणि हात वारंवार धुणे, या त्रिसुत्रीचे सर्वांनी पालन करावे. आपल्या सर्वांच्या जबाबदारीच्या वागण्यातूनच कोरोनावर मात करणे शक्‍य होणार आहे, याची जाणीवही उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात करून दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *