Home रानशिवार होळी, धूलिवंदन, रंगपंचमी साधेपणाने साजरी करण्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाचे...

होळी, धूलिवंदन, रंगपंचमी साधेपणाने साजरी करण्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाचे आवाहन

80
vijay vadettiwar

नागपूर : होळी, धूलिवंदन व रंगपंचमीच्या सणावर कोविड – १९ चे सावट असल्याने घरातच राहून हे सण साजरे करा व याबाबत शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करा, असे आवाहन आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार [ vijay vadettiwar ] यांनी केले असून नागरिकाना होळी, धूलिवंदन व रंगपंचमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

होळी किंवा शिमगा हा सण संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावर्षी 28 मार्च 2021 रोजी होळीचा सण आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता कोणत्याही प्रकारे गर्दी न करता, सोशल डिस्टन्सींगच्या नियमांचे पालन करुन हा सण साधेपणाने साजरा करावा. रंगपंचमी सणानिमित्ताने एकमेकांवर रंग टाकणे, पाणी टाकणे, एकमेकांना गुलाल लावून रंगाची उधळण करण्यात येत असते, परंतू कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी धूलिवंदन व रंगपंचमी हे सण साधेपणाने साजरे करावेत असे श्री.  वडेट्टीवार यांनी सांगितले.

होळीचा सण साजरा करताना वायू प्रदुषण होणार नाही, याची नागरिकांनी काळजी घ्यावी. धूलिवंदनाच्या दिवशी रंगांचा वापर न करता पाण्याचाही अपव्यय टाळावा, सार्वजनिक ठिकाणी अगर रस्त्यावर एकत्र येणे अथवा गर्दी करणे टाळावे. कोणत्याही प्रकारे गर्दी आकर्षित होणार नाही, अशा धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे अथवा मिरवणुकांचे आयोजन करू नये, असे आवाहन श्री. वडेट्टीवार यांनी नागरिकांना केले आहे.

कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महानगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत, पोलीस प्रशासन, स्थानिक प्रशासन युध्द पातळीवर काम करीत असून त्यांनी विहित केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन श्री. वडेट्टीवार यांनी नागरिकांना केले आहे. कोरोनावर लस आल्यामुळे कोरोनावर आपण विजय मिळवू शकू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

हेही वाचा :

राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडून जनतेला होळी,रंगपंचमीनिमित्त शुभेच्छा
कोरोना वाढतोय, होळी आणि धुलीवंदनाच्या सुटीला घरातच रहा