Home उपराजधानी नागपूर गृह अलगीकरणात असणारे बाधित घराबाहेर पडणार नाही यासाठी कडक कारवाई करण्याचे ...

गृह अलगीकरणात असणारे बाधित घराबाहेर पडणार नाही यासाठी कडक कारवाई करण्याचे निर्देश

34

नागपूर : शहरांमध्ये दररोज मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढत असून आरोग्य यंत्रणेवर ताण आहे. मात्र या परिस्थितीत शहरातील मेयो, मेडिकल व खासगी हॉस्पिटलमधील बेडची संख्या युद्धस्तरावर वाढविण्याचे निर्देश गृहमंत्री अनिल देशमुख [ HOME MINISTER ANIL DESHMUKH] यांनी आजच्या बैठकीत दिले. नागपूर शहराला ऑक्सिजनचा पुरवठा सुव्यवस्थित होण्यासाठी त्यांनी यावेळी बैठकीतूनच अन्न व औषधी विभागाच्या आयुक्तांना निर्देशित केले.

नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणात बाधितांची संख्या पुढे येत आहे. कोरोना मृत्यू संख्येतही भर पडत आहे. पुढचे पंधरा दिवस अतिशय जिकरीचे असल्याच्या वैद्यकीय सूचना आहे. अशावेळी नागपूर महानगर व जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा गृहमंत्र्यांनी घेतला. यावेळी त्यांनी बेडची उपलब्धता, ऑक्सिजन व औषधींची उपलब्धता खासगी दवाखान्यावरील नियंत्रण चाचण्यांची सद्यस्थिती आणि ग्रामीण व शहरी भागातील लसीकरणाचा आढावा घेतला.

बैठकीला विभागीय आयुक्त डॉ. संजीवकुमार, पोलीस आयुक्त  अमितेश कुमार, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी., मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, महापालिकेचे अपर आयुक्त जलज शर्मा, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता, इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता अजय केवलिया, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जायस्वाल, जिल्हा आरोग्य अधिकारी डी.एस. सेलोकार, ग्रामीणचे पोलीस अधीक्षक राकेश ओला. उपायुक्त बसवराज तेली, मनपा अपर आयुक्त राम जोशी, तसेच पोलीस, महसूल, आरोग्य, शिक्षण, अन्न व औषध प्रशासन, महानगरपालिका आदी विभागाचे वरिष्ठ  अधिकारी, टास्क फोर्सचे [ TASK FORCE ] पदाधिकारी उपस्थित होते.

शहरामध्ये मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत नागरिकांनी गरज नसेल तर घराबाहेर न पडणे योग्य आहे. मात्र वेगवेगळ्या उपाययोजना केल्यानंतरही नागरिकांची रस्त्यावरील गर्दी कमी होत नसल्याबाबतची चिंता यावेळी अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. राज्य सरकारने 15 एप्रिल पर्यंत सायंकाळी आठ ते सकाळी सातपर्यंत जमावबंदी जाहीर केली आहे. 31 मार्चपर्यंत शहरात स्थानिक स्तरावरचे बंदीचे आदेश आहेत. यासंदर्भात पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्याशीही त्यांनी दूरध्वनीवर चर्चा केली. नागपूर शहर व जिल्ह्यामधील कोरोना काळातील बंदी संदर्भातील निर्णय 30 तारखेनंतर घेतला जाईल, असे यावेळी त्यांनी सांगितले.

बैठकीमध्ये गृहमंत्र्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय या दोन ठिकाणी बेडच्या उपलब्धतेचा आढावा घेतला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये सोमवारपासून दर दिवसाला 30 बेड वाढविण्याची तयारी महाविद्यालयाच्या प्रशासनाने दाखविली आहे. यावेळी त्यांनी अधिष्ठाता सोबत चर्चा करत वैद्यकीय महाविद्यालयातील बेडची संख्या एक हजारापर्यंत वाढवण्याचे आवाहन केले.

न्यायालयाच्या निर्देशानंतर मेडिकल बेसमेंटमध्ये देखील उपाययोजना करण्याबाबत त्यांनी सूचित केले. तसेच यावेळी महाविद्यालयाच्या आस्थापनेकडून कोरोना काळात रुग्णसेवा करणाऱ्या पोस्ट ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांच्या परीक्षांची अडचणीबद्दल चर्चा केली. रुग्णसेवेत या विद्यार्थ्यांचा मोठा वाटा असून वरिष्ठ स्तरावर बोलून सद्यस्थितीत या विद्यार्थ्यांना रूग्ण सेवेमध्ये अडचण येणार नाही, यासाठी संबंधित विभागाला बोलणार असल्याचे त्यांनी सांगितले. अतिरिक्त मनुष्यबळासाठीही त्यांनी यावेळी उपाययोजना करण्यासंदर्भात सुचविले.

कोरोना रुग्णसंख्या वाढल्यामुळे अन्य आजाराच्या  फक्त गंभीर रुग्ण मेडिकलमध्ये घेतले जात असून सर्व नॉन कोविड वार्ड कोविड वार्डात रूपांतरीत करण्याचेही त्यांनी सूचविले.

ग्रामीण भागातील लसीकरणाला गती देण्यासाठी राजकीय, सामाजिक व वेगवेगळ्या स्वयंसेवी संस्थांची मदत घेण्याबाबत त्यांनी सूचना केली. यासाठी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, यांनी सर्व स्तरातील मान्यवरांना पत्र लिहून आवाहन करण्याची सूचना केली. नागपूर ग्रामीण भागामध्ये 55 टक्के लसीकरण झाले असून शहरी भागांमध्ये जवळपास 35 टक्के लसीकरण झाले आहे. लसीकरणाशिवाय कोरोना युद्ध जिंकता येणार नाही. त्यामुळे यासंदर्भात अधिक गतिशील होण्याबाबत त्यांनी जिल्हा व मनपा प्रशासनाला यावेळी निर्देशित केले.

कोरोनाची बिकट परिस्थिती शहरांमध्ये आहे. पुढील दहा पंधरा दिवस नागपूरकरांसाठी अतिशय कठीण असून या काळामध्ये कोरोना आणखी पसरणार नाही. यासाठी प्रशासनाची मदत करण्याबाबत आवाहन महानगरपालिका आयुक्त राधाकृष्ण यांनी केले. महानगरातील खासगी दवाखान्यात मधून मोठ्या प्रमाणात मदत होत आहे. तसेच गेल्या काही दिवसात महानगरपालिकेने विशेष मोहीम राबवित खासगी हॉस्पिटलमध्ये जवळपास साडेतीन हजार बेडची उपलब्धता केली आहे. खासगी हॉस्पिटलालाही भासणाऱ्या ऑक्सिजनच्या उपलब्धतेची अडचण त्यांनी सांगितली. यानंतर गृहमंत्र्यांनी अन्न व औषधी विभागाचे आयुक्तांशी बोलत नागपुर मधील सद्यस्थिती लक्षात आणून दिली. तातडीने ऑक्सिजनचा पुरवठा करण्याबाबतचे निर्देश दिले.

गृह अलगीकरणात असणारे बाधित घराबाहेर पडणार नाही यासाठी कडक कारवाई करण्याचे त्यांनी सांगितले सुपरस्पेडर असणाऱ्या घटकावर देखील लक्ष वेधण्याचे त्यांनी सांगितले यावेळी पोलिस विभागाचा देखील त्यांनी आढावा घेतला राज्य शासनाचा कोविड प्रोटोकॉल प्रमाणे पोलीस विभागाने कार्य करण्याचेही त्यांनी निर्देशित केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here