Home मुंबई बेड्स, व्हेंटीलेटर कमी पडताहेत, मृत्यूंची संख्या वाढू शकते

बेड्स, व्हेंटीलेटर कमी पडताहेत, मृत्यूंची संख्या वाढू शकते

21

Mumbai : राज्यातील अतिशय झपाट्याने वाढणाऱ्या संसर्गामुळे लवकरच सर्व महत्त्वाच्या आरोग्य सुविधांवर विशेषत: बेड्स, व्हेंटीलेटर, व ऑक्सिजनवर प्रचंड ताण येऊन त्या सर्वसामान्य रुग्णांना उपलब्ध होणार नाहीत, अशी परिस्थिती असल्याचे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी निदर्शनास आणले.

ते म्हणाले की, सध्या ३ लाख ५७ हजार आयसोलेशन खाटापैकी १ लाख ७ हजार खाटा भरल्या आहेत आणि उर्वरित खाटा झपाट्याने भरल्या जात आहेत. ६० हजार ३४९ ऑक्सिजन खाटापैकी १२ हजार ७०१ खाटा, १९ हजार ९३० खाटापैकी ८ हजार ३४२ खाटा यापूर्वीच भरल्या गेल्या आहेत. ९ हजार ३० व्हेंटीलेटर्सपैकी १ हजार ८८१ वर रुग्णांना  ठेवण्यात आले आहे. काही जिल्ह्यांमध्ये तर खाटा उपलब्धच होत नसून संसर्ग वाढीच्या प्रमाणात सुविधाची क्षमता  कमी पडते आहे.

वेळीच चाचणी न केल्याचे गंभीर परिणाम दिसताहेत

गेल्या वर्षी १७ सप्टेंबर रोजी ३ लाख सक्रिय रुग्ण होते आणि ३१ हजार ३५१ मृत्यू झाले होते मात्र आता काल २७ मार्च रोजी ३ लाख ३ हजार ४७५ सक्रिय रुग्ण असून मृत्यूंची संख्या ५४ हजार ७३ झाल्याने चिंता वाढली आहे. विशेषत: संसर्ग वाढल्यास त्या प्रमाणात मृत्य वाढू शकतात आणि यामागे वेळेवर चाचणी न करून रुग्णालयांत भरती होण्यास उशीर करणे तसेच होम आयसोलेशनमध्ये [ ISOLATION ] असतानाही नियमांचे पालन न करणे ही कारणे असू शकतात, असेही टास्क फोर्सच्या डॉक्टर्सनी निदर्शनास आणले. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये एका दिवशी २४ हजार ६१९ रुग्ण आढळले होते. काल २७ मार्च रोजी एका दिवशी ३५ हजार ७२६ रुग्ण आढळले असून ही संख्या येत्या २४ तासांत ४० हजार झालेली असेल, अशीही माहिती आरोग्य विभागाने दिली.

ई आयसीयूवर भर : आरोग्यमंत्री

आरोग्यमंत्री राजेश टोपे [ Maharashtra Health Minister Rajesh Tope ] यांनी देखील ग्रामीण भागात रुग्णांचा आणि त्यांच्या संपर्काचा शोध अधिक गतिमान करण्याची गरज व्यक्त केली.  विशेषत: छोट्या शहरात आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याचे आव्हान असून ई आयसीयूवर भर देण्यासाठी पाऊले उचलण्यात येतील, असे सांगितले. महाराष्ट्रातील लसीकरण देशात चांगले असून ग्रामीण भागात उपलब्ध शीत साखळी वापरून उपकेंद्रांवर लसीकरण वाढवले तर अधिक वेग मिळेल, असे सांगितले.

कोरोना संसर्ग झालेल्या व्यक्ती उशिरा रुग्णालयांत पोहचत आहेत ही चिंतेची बाब आहे. अगदी  १० ते १८ वयोगटात देखील मोठ्या प्रमाणावर संसर्ग दिसत असून पुढील काळात तरुणांमध्ये देखील मृत्यूचे प्रमाण वाढू शकते अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

अर्थचक्र प्रभावित होणार नाही : मुख्य सचिव

मुख्य सचिव सीताराम कुंटे म्हणाले की, महाराष्ट्रात लसीकरणाचा वेग समाधानकारक आहे. तसेच गेल्या काही दिवसांपासून चाचण्यांचे प्रमाणही चांगले झाले असल्याचे केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सांगितले असून ज्याठिकाणी संसर्ग वाढ जास्त आहे तिथे लसीकरणाचा वेग वाढवण्याची सुचना त्यांनी केल्याचे ते म्हणाले. लॉकडाऊनचा निर्णय झाल्यास कोणताही गोंधळ उडू नये व समन्वय राहावा म्हणून योग्य त्या सुचना प्रशासनास देण्यात येत आहेत तसेच अर्थचक्रही प्रभावित होणार नाही त्याचे संतुलन ठेवण्यात येईल.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here