Home उपराजधानी नागपूर बेजबाबदारीची हद्द : कोरोनाबाधित कामगारांचा परप्रांतात प्रवास

बेजबाबदारीची हद्द : कोरोनाबाधित कामगारांचा परप्रांतात प्रवास

48

नागपूर : गीतामंदिर समोरील गुजरवाडी परिसरात निमार्णाधीन म्हाडा कॉलनीच्या कामगार वसाहतीतील कोरोनाबाधित कामगार खुलेआम फिरत असल्याच्या माहितीवरून महापौर दयाशंकर तिवारी यांनी पथकासह आकस्मिक भेट दिली. यावेळी कोरोनाबाधित कामगार स्वगावी गेल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले. यासाठी म्हाडा व्यवस्थापनाला नोटीस बजावण्यात आली असून, तातडीने स्पष्टीकरण मागण्यात आले.

म्हाडा कॉलनीच्या बांधकामावर सुमारे ३०० मजूर कार्यरत आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता मनपाच्या आरोग्य विभागाच्या वतीने येथे विशेष चाचणी शिबीर घेण्यात आले होते. यात सहा कामगार पॉझिटिव्ह निघाले आणि सहा जणांना पुन्हा चाचणी करण्यास सांगण्यात आले होते. पॉझिटिव्ह आलेल्याना गृहविलगीकरणाचा सल्ला देण्यात आला होता. मात्र, संबंधित रुग्ण बाहेर मास्कविना खुलेआम फिरत असून, कॉटन मार्केट, गणेश पेठ, गुजरवाडी या भागात खरेदीसाठी फिरत असल्याची माहिती महापौर दयाशंकर तिवारी यांना फोनद्वारे मिळाली.

महापौरांनी तत्काळ सहायक वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, डॉ. पोवाने, उपद्र्रव शोधपथक आणि मनपाच्या आर. आर. टी. पथकासह कामगार वसाहत गाठली. यावेळी त्याठिकाणी धक्कादायक दिसून आले. बहुतांश कामगार मास्कविना होते. व्यवस्थापनाचे लोक उपस्थित नव्हते. त्यांना फोनद्वारे माहिती देण्यात आली. मजूर कंत्राटदारावर (लेबर कॉन्ट्रॅक्टर) जबाबदारी ढकलत त्याचा फोन क्रमांक देऊन ते मोकळे झाले. यानंतर कंत्राटदाराने १५ मिनिटांत पोहच असल्याचे सांगून बोळवण केली फोन बंद करून ठेवला. यानंतर अधिकाºयांनी कामगार वसाहतीचा दौरा केला असता सहा पैकी केवळ दोनच पॉझिटिव्ह रुग्ण असल्याची धक्कादायक बाब समोर आली. उर्वरित अन्य कामगारांसोबत मध्यप्रदेश, उत्तर प्रदेशातील आपल्या स्वगावी गेल्याची बाब समोर आली.

मोठा गुन्हा
संबंधित मजुरांनी रेल्वेसारख्या वा अन्य प्रवासातही कोरोना पोहोचवण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. नक्कीच हा मोठा गुन्हा आहे़ जाणीवपूर्वक ही महामारी पसरवण्यात येत असल्याचे प्राथमिकस्तरावर दिसून येते, हे नक्की. दरम्यान, म्हाडा व्यवस्थापनाच्या या हलगर्जीपणाबद्दल महापौरांनी व्यवस्थापनाला नोटीस बजावून उद्यापर्यंत सविस्तर माहिती देण्यास सांगण्यात आले आहे. अहवाल आल्यानंतर दंडात्मक आणि पोलिस कारवाई करण्याचेही निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिले आहे.

आमची भूमिका
राज्यातील सध्या कोरोना संसर्गाची दुसरी लाट असून, मोठे संकट घोंगावत आहे़ केंद्र आणि महाराष्ट्र सरकारकडून सर्व नियम पाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे़ याशिवाय संसर्ग नियंत्रित करण्यासाठी सर्व प्रकारच्या उपाययोजना करण्यात येत आहे. याशिवाय मागील सोमवारपासून राज्यभरात रात्रीची संचारबंदी लावण्यात आली आहे;परंतु कुणीही ऐकण्यास तयार नाही़ समाजात अतिशय बेजबाबदारपणा दिसून येत आहे. पुढील 15 एप्रिलपर्यंत रात्रीची संचारबंदी असूनही पहाटे अनेकजण फिरावयास घराबाहेर पडत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here