Home मनोरंजन ... चित्रपट,संगीत,नाटक,नृत्य शेवटच्या श्वासापर्यंत प्रेमाची भुकेली रंजना…

शेवटच्या श्वासापर्यंत प्रेमाची भुकेली रंजना…

244

गोंधळात गोंधळ, मुंबईचा फौजदार, सुशीला, जखमी वाघीण, भुजंग, एक डाव भुताचा यांसह अनेक चित्रपटांमध्ये रंजना झळकली. ही ८० च्या दशकातील मराठीतील आघाडीची अभिनेत्री. ‘लेडी कॉमेडियन’ म्हणूनही रंजनाला ओळखले जाते. करिअर यशोशिखरावर असतानाच एक वळण असे आले,की तिचे संपूर्ण आयुष्यच बदलून गेले. तिची जीवन कहाणी कुणालाही हेलावून सोडणारी आहे. याचवर्षी ३ मार्च २०२१ रोजी रंजनाला या जगाचा निरोप घेऊन २१ वर्षांचा काळ लोटला आहे.

अभिनेत्री रंजना [ actress ranjana ] ही प्रसिद्ध अभिनेत्री वत्सला देशमुख यांची कन्या. ‘पिंजरा’ चित्रपटात अभिनेत्री संध्याच्या बहिणीच्या भूमिकेत वत्सला यांना आपण बघितले आहे. याशिवाय अनेक हिंदी चित्रपटांमध्येही त्यांनी भूमिका साकारल्या आहेत.
अभिनेत्री संध्या यांच्यासोबत रंजनाचे अतिशय जवळचे नाते. संध्या या वत्सला देशमुख यांच्या धाकट्या भगिनी. या नात्याने त्या रंजनाच्या मावशी आहेत. संध्या यांचे लग्न व्ही. शांताराम यांच्यासोबत झाले होते. त्यामुळे रंजना या व्ही. शांताराम [ v. shantaram ] यांच्या भाची होत्या. त्यांनीच रंजनाला १९७५ मध्ये ‘चंदनाची चोळी अंग अंग जाळी’ चित्रपटातून पडद्यावर आणले होते. पहिल्याच चित्रपटात रंजनाने रसिकांची मने जिंकली.

रंजनाने केलेले चित्रपट आणि त्यातील गाणी आजही लोकांच्या स्मरणात आहे. ‘मुंबईचा फौजदार’मधील ‘हा सागरी किनारा…’, तसेच ‘अरे संसार संसार’मधील ‘निसर्ग राजा…’ ही रंजनाची गाणी आजदेखील गुणगुणली जातात. विनोदी भूमिकांसोबतच गंभीर भूमिकांमध्येही ती उजवी ठरली. खेड्यातील मुलीपासून ते शहरातील मॉडर्न गर्लपर्यंतच्या प्रत्येक भूमिकेत स्वत:ला अक्षरश: झोकून द्यायची. ‘भुजंग’मधील ग्रामीण स्त्री असो वा ‘भालू’ चित्रपटातील उच्चशिक्षित स्त्रीची भूमिका असो, रंजना कुठेच कमी पडली नाही.
सासू वरचढ जावई, सुशीला, चानी, केला इशारा जाता जाता, भालू, खिचडी, लक्ष्मीची पाऊले, सावित्री, जखमी वाघीण, गोंधळात गोंधळ, सासुरवाशीण, बिन कामाचा नवरा, मुंबईचा फौजदार आदी चित्रपटांतून रंजनाने आपली अभिनयशक्ती जागवली. १९८० मध्ये ‘अरे संसार संसार’ आणि १९८३ मध्ये ‘गुपचूप गुपचूप’ चित्रपटांसाठी तिला राज्यसरकारचा उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता. रंजनाची ‘मामा’ अशोक सराफ यांच्यासोबत आॅनस्क्रीन केमिस्ट्री खूप छान जमून आली होती. रंजना आणि अशोक सराफ एकमेकांच्या प्रेमात पडल्याचीही चर्चा रंगली होती. ही शेवटपर्यंत केवळ एक चर्चाच ठरली. सर्व काही सुरळीत सुरू असताना एका क्षणात तिचे आयुष्यच पालटून गेले.
‘झुंजार’च्या (१९८३) चित्रीकरणासाठी बंगळुरूला जात असताना कार अपघातात रंजनाला कायमचे अपंगत्व आले. तिचे संपूर्ण आयुष्यच बदलून गेले. शेवटपर्यंत सावरू शकली नाही.

आयुष्याचे नाटक
रंजनाने मराठी नाटक ‘फक्त एकदाच’मधून पदार्पण केले होते. हे नाटक रंजनाच्या आयुष्यावर आधारित असल्याचे म्हटले जाते. व्हीलचेअरवर असलेल्या स्त्रीला तिचा प्रियकर सोडून जातो, असे कथानक असलेले हे नाटक रंगभूमीवर आले, ज्यात तिने अखेरची भूमिका केली होती.
अशातच ३ मार्च २००० रोजी हृदय बंद पडल्याने रंजनाने वयाच्या अवघ्या ४५ व्या वर्षी कायमचा निरोप घेतला. एका मुलाखतीत रंजनाच्या मातोश्री वत्सला देशमुख यांनी सांगितले होते, अपघातानंतर रंजनाला अपंगत्व आले. तशा अवस्थेतही तिने अनेक वर्षे काढली. मृत्यू समोर दिसत असतानाही मृत्यूला घाबरली नाही. आनंदी होत मृत्यूला हसतमुखाने ती सामोरी गेली.

रंजना यांची गाजलेली गाणी :
* सत्यम् शिवम् सुंदरा…
* हा सागरी किनारा…
* विठू माऊली तू माऊली…
* कुण्या गावाचं आलं पाखरू…
* साता नवसानं मिळाला…
* अगं अगं म्हशी…