लॉकडाऊनसंदर्भातील राज्य शासनाच्या निर्देशाचे कडकपणे पालन करण्यात येणार

उपराजधानी नागपूर

नागपूर : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची  संख्या सातत्याने वाढत असून लसीकरण करुन घेणे हा त्यावरील एकमेव उपाय आहे. जिल्ह्यात नवीन स्ट्रेनच्या रुग्णांची संख्या वाढत असली तरी जनतेने आरटीपीसीआर तपासणी करुन आरोग्य यंत्रणेने दिलेल्या सूचनांचे पालन करण्यासोबतच गृह विलगीकरणातील रुग्णांनी  विशेष दक्षता घ्यावी. लॉकडाऊनसंदर्भातील राज्य शासनाच्या निर्देशाचे कडकपणे पालन करण्यात येणार असल्याची घोषणा पालकमंत्री डॉ. नितीन राऊत [ energy minister niteen raut ] यांनी केली.

वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक पालकमंत्री डॉ. राऊत यांच्या  अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आयोजित बैठकीस मुंबईहून गृहमंत्री अनिल देशमुख, महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष रश्मी बर्वे, महापौर दयाशंकर तिवारी, खासदार डॉ. विकास महात्मे, आमदार सर्वश्री गिरीश व्यास, अभिजित वंजारी, विकास कुंभारे, ॲड. आशिष जयस्वाल, समीर मेघे, टेकचंद सावरकर, राजू पारवे, प्रवीण दटके आदी लोकप्रतिनिधी, विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, पोलीस आयुक्त डॉ. अमितेश कुमार, महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी., जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, महापालिका अपर आयुक्त  जलज शर्मा, आयएमएच्या अध्यक्षा अर्चना कोठारी, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता, टास्क फोर्सचे पदाधिकारी, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

नवीन स्ट्रेनच्या  कोरोना विषाणूचे रुग्ण जिल्ह्यात आढळून आले असून नागरिकांनी आरटीपीसीआर ही तपासणी प्राधान्याने करण्याचे आवाहन करताना पालकमंत्री म्हणाले की, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्रशासनातर्फे तपासण्यांची संख्या वाढविण्यासाठी अडीचशे केंद्रे सुरु केली आहेत. ती वाढविण्यासाठी केंद्र शासनाला विनंती करण्यात आली आहे. मास्कचा वापर,सोशल डिस्टन्सिंग व नियमित हात धुणे यासह कोरोना लस घेण्याला प्राधान्य देण्यात आले आहे. नागरिकांच्या जीविताचे रक्षण करणे  त्यासोबतच रुग्णालयातील बेडची संख्या वाढविण्याला प्राधान्य देण्यात आले आहे.  बेडच्या उपलब्धतेसंदर्भात समन्वय अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या असून जनतेलाही बेडच्या उपलब्धतेबाबत माहिती देण्यात येईल, अशी माहिती पालकमंत्र्यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *