Home विदर्भ यवतमाळ भारत जगाचे मॅन्युफॅक्चरिंग हब सिद्ध होऊ शकेल

भारत जगाचे मॅन्युफॅक्चरिंग हब सिद्ध होऊ शकेल

43

यवतमाळ : देशाचे महासत्तेत रूपांतरण करण्यासाठी येथील मोठ्या लोकसंख्येचे तंत्रकुशल मनुष्यबळात परिवर्तन घडवणे ही आजची सर्वाधिक महत्त्वाची गरज आहे. त्यात आपणास यश मिळाल्यास भारत निश्चितच एक जागतिक महासत्ता म्हणून उदयास येऊ शकेल, असे प्रतिपादन नागपूर-अमरावती विभागाचे माहिती संचालक हेमराज बागुल यांनी केले.

येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये [ yavatmal polytechnic ] भारतीय स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षानिमित्त साजरा करण्यात येत असलेल्या ‘आझादी का अमृत महोत्सव’ या उपक्रमांतर्गत श्री बागुल दूरदृश्य प्रणालीद्वारे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एन. शिंगाडे उपस्थित होते. गेल्या 12 मार्चपासून महाविद्यालयात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. आज या उपक्रमांतर्गत संचालक हेमराज बागुल यांचे व्याख्यान झाले.

भारताला एक महासत्ता म्हणून प्रस्थापित करण्यासाठी समस्यांचे रूपांतर संधीत करण्याची गरज असल्याचे सांगून श्री. बागुल म्हणाले, आपली लोकसंख्या जास्त असली तरी तिच्या सध्याच्या रचनेमुळे त्यातील ‘प्रॉडक्टिव पाप्युलेशन’ [ population hub ] ही जवळपास 62 टक्के इतकी मोठी आहे. जगात एवढी उत्पादनक्षम लोकसंख्या कोणत्याही देशाची नाही. परिणामी भारत हा डेमोग्राफिक डिव्हिडंडचा  जगातील सर्वात मोठा लाभार्थी आहे. त्यातील पन्नास टक्क्यांहून अधिक लोकसंख्या तरुणांची आहे. हे तरुण चांगल्या पद्धतीने तंत्रकुशल झाल्यास भारत भविष्यातील जगाचे मॅन्युफॅक्चरिंग हब सिद्ध होऊ शकेल. त्यातून येथील अर्थव्यवस्था जगातील आघाडीची अर्थव्यवस्था म्हणून नावारूपास येऊ शकेल. कौशल्य विकासाचा कार्यक्रम शासनाकडून याच हेतूने राबविण्यात येत आहे.

एक परिपूर्ण महासत्ता होण्यासाठी केवळ आर्थिक आघाडीवर काम करून चालणार नाही, असे स्पष्ट करून श्री. बागुल म्हणाले सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक अशा विविध आघाड्यांवर मोठे बदल घडले पाहिजेत. सरकार आपल्या पद्धतीने याबाबत प्रयत्नशील आहेच. मात्र या प्रयत्नांमध्ये व्यापक लोकसहभाग असला पाहिजे तरच त्यात आपणास पूर्ण यश मिळू शकेल. त्यासोबत राष्ट्रीय चारित्र्याची भावनाही सर्वांमध्ये रुजावी. व्यक्ती म्हणून स्वतःचा विकास करतानाच नागरिक म्हणूनही आपल्या जाणिवा विकसित व्हाव्यात, असेही ते म्हणाले.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्रा. प्रशांत सब्बनवार यांनी या महोत्सवाच्या आयोजनामागची भूमिका विशद केली. प्रा. उज्वला शिरभाते यांनी प्रमुख वक्त्यांचा परिचय करून दिला. यावेळी प्रा. जी. के. यादव, प्रा. एस. बी. भोसले आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here