Home उपराजधानी नागपूर प्रशासनापासून सामान्य नागरिक, दुकानदार तर फेरीवाल्यांपर्यंत सर्वांनी कोरोना नियमांचे काटेकोर पालन करावे

प्रशासनापासून सामान्य नागरिक, दुकानदार तर फेरीवाल्यांपर्यंत सर्वांनी कोरोना नियमांचे काटेकोर पालन करावे

81

नागपूर : राज्यशासनाने ‘ब्रेक द चेन’ [ BREAK THE CHAIN ] अंतर्गत नव्याने काढलेले निर्णय स्वयंस्पष्ट आहेत. कोरोनावर मात करण्यासाठी पुढील काळात कडक निर्बंध पाळणे गरजेचे आहे. नागपूर शहरातील उद्रेक लक्षात घेता प्रशासनापासून तर सामान्य नागरिकांपर्यंत दुकानदारापासून तर फेरीवाल्यांपर्यंत सर्वांनी या नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांनी केले आहे.

4 एप्रिल रोजी ‘ब्रेक दि चेन’च्या आदेशात ज्या आवश्यक सेवांचा उल्लेख होता, त्यात आणखी काही सेवांचा समावेश 5 एप्रिल रोजी राज्य सरकारने केला आहे. त्या  आदेशानुसार आता पेट्रोल पंप, आणि पेट्रोलियम संबंधित उत्पादने, सर्व प्रकारच्या कार्गो सेवा, डेटा सेंटर, क्लाऊड सर्व्हिस प्रोव्हायडर्स, आयटी-माहिती तंत्रज्ञान सबंधित महत्वाच्या पायाभूत सुविधा आणि सेवा, शासकीय व खासगी सुरक्षा सेवा व फळविक्रेत्यांच्या सेवेचा समावेश आहे. या सेवा देखील आवश्यक सेवामध्ये येतील. आवश्यक सेवांची मर्यादा वाढविल्याने जनजीवन सुरळीत सुरू राहील असा विश्वास पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी व्यक्त केला.

5 ते 30 एप्रिल पर्यंत लावण्यात आलेल्या कडक निर्बंधाविषयक नागपुरातील छोटे-मोठे दुकानदार, व्यापारी, व्यापारी संघटना/संस्था यांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत. त्याबाबत मुख्यमंत्र्यांशी  व्यक्तिगत भेटून चर्चा करणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

राज्य शासनाने केलेल्या आदेशानुसार संचारबंदीच्या वेळेत म्हणजे रात्री 8 ते सकाळी 7 या वेळेत रेल्वे, बसेस, विमान प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांनी अडचणी टाळण्यासाठी  जवळ अधिकृत तिकिट बाळगावे. औद्योगिक कामगारांनी त्यांच्या कामाच्या वेळापत्रकानुसार ओळखपत्र सोबत बाळगावे. विवाह किंवा अंत्यसंस्कारासाठी 4 एप्रिल रोजी दिलेल्या आदेशातील  नियमांचे पालन करून परवानगी देता येऊ शकेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

देशभरात महाराष्ट्र कोरोना लसीकरणात अव्वल