Home राजधानी मुंबई हातावर पोट असणाऱ्या वर्गाची सगळ्यांनाच चिंता

हातावर पोट असणाऱ्या वर्गाची सगळ्यांनाच चिंता

28

मुंबई : एकीकडे लसीकरण वाढविण्याची खूप गरज आहे. यूकेने दोन महिने आधीच कडक लॉकडाऊन केला पण त्या काळात मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम राबवून नागरिकांना संरक्षित केले. आज युवा पिढीला लस देण्याची गरज आहे. फायझर कंपनी तर १२ ते १५ वयोगटातील मुलांना लस देण्याचे नियोजन करतेय. कडक निर्बंध लावताना गरीब, श्रमिक, हातावर पोट असणाऱ्या वर्गाला त्रास होऊ नये ही सर्वांचीच  भूमिका आहे. त्यादृष्टीने जरुर विचार झाला पाहिजे आणि केला जाईल पण दररोज झपाट्याने वाढणारा संसर्ग आणि रुग्णवाढ काहीही करून प्रथम रोखणे अतिशय गरजेचे आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

सर्वानुमते एकमुखाने निर्णय घेऊन या संकटावर मात कशी करावी ते ठरविले पाहिजे. यासाठी लोकांमध्ये आपण सर्व पक्षांनी जागृती केली पाहिजे. रुग्णसंख्या इतक्या वेगाने वाढते आहे की, आज आपण लॉकडाऊनबाबत निर्णय घेतला नाही तर उद्या आपोआपच लॉकडाऊनसारखी परिस्थिती उद्भवेल. कोरोना सर्वानांच टार्गेट करीत आहे. त्यात सगळे आले. हातावर पोट असलेला वर्ग सगळ्या विभागांत आणि क्षेत्रात आहे त्यामुळे विचार करायचा तर सगळ्यांचाच करावा लागतो. आज परिस्थिती बिकट बनत चालली आहे. टास्क फोर्सच्या तज्ञांचे म्हणणेदेखील आम्ही सातत्याने विचारात घेत आहोत. एका बाजूला जनभावना आहे पण दुसऱ्या बाजूला कोरोनाचा उद्रेक आहे , अशा परिस्थितीत ही लढाई जिंकायची असेल तर थोडी कळ तर काढावीच लागेल असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मी गेल्या काही दिवसांपासून विविध क्षेत्रातील लोकांशी बोलतो आहे. काल मी खासगी रुग्णालयांच्या संचालकांशी पण बोललो. राज्य शासनाला सहकार्य करण्याची सगळ्यांची तयारी आहे. सर्व पक्षीय नेत्यांना माझे आवाहन आहे की राज्यातील जनतेच्या आरोग्याला प्राधान्य देऊन जो काही निर्णय घेतला जाईल त्याला आपले सहकार्य द्यावे असे आवाहन त्यांनी केले.

काही काळासाठी का होईना, पण कडक निर्बंध लावावेच लागतील

राज्यातील हीरा उत्पादन क्षेत्र ठाकरे सरकारसोबत

यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, चंद्रकांत पाटील यांनी आपल्या सूचना मांडल्या. रेमडेसिवीर उपलब्धता, ऑक्सिजन नियोजन, लॉकडाऊन लावण्यापूर्वी संतुलित भूमिका घेणे आदी विषय त्यांनी मांडले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले की रेमडेसिवीरचा काळाबाजार थांबविण्यासाठी कडक पावले उचलावी लागतील तसेच या औषधाचा अतिरेकही थांबवावा लागेल.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रत्येक नगरपरिषद व पालिकेकडे लिक्विड ऑक्सिजन साठा टँक उभारण्यासाठी आवश्यक तो निधी देऊन तात्काळ कार्यवाही करावी असे सुचविले. नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील ऑक्सिजन कमतरता वाढल्याने प्रश्न उद्भवले असून कडक निर्बंध लावून रुग्ण वाढ रोखावी असे सांगितले. सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, तसेच आमदार नाना पटोले, प्रधान सचिव आरोग्य डॉ प्रदीप व्यास. डॉ. तात्याराव लहाने यांनीदेखील विचार मांडले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here